कऱ्हाड : ‘लव्ह जिहाद’प्रकाराचे फॅड सध्या वाढले असून, या प्रकारातून अल्पवयीन मुली तसेच युवतींची फसवणूक करण्यात येत आहे. कऱ्हाड शहरात गेल्या काही वर्षांत या प्रकाराचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण याच्या आहारी जात आहेत. युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा हा ‘लव्ह जिहाद’ थांबविण्यात यावा व याचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी करीत शनिवारी कऱ्हाडकातील नागरिकांनी काळ्या फिती लावून मूकमोर्चा काढला. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. येथील विठ्ठल चौकातून मूकमोर्चाची सुरुवात झाली. हिंदू एकता आंदोलनचे व भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, विष्णू पाटसकर, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, राजू कदम, नितीन ओसवाल, जितेंद्र ओसवाल, दिनेश पोरवाल, मनसेचे दादा शिंगण, केदार डोईफोडे आदींंसह नागरिक सहभागी झाले. सर्वांनी हाताला काळ्या फिती लावून ‘लव्ह जिहाद’चा निषेध केला. विठ्ठल चौकातून सकाळी अकरा वाजता मूकमोर्चास प्रारंभ झाला. मोर्चा दत्त चौकात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. अभिवादनानंतर मोर्चा बसस्थानक परिसरातील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय येथे नेण्यात आला. त्या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजलक्ष्मी शिवणकर यांना नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, कऱ्हाड शहरामध्ये गेल्या चार-पाच वर्षांपासून काही समाजकंटक ‘लव्ह जिहाद’चा आधार घेत शैक्षणिक व सार्वजनिक ठिकाणी मुलींना त्रास देत आहेत. ‘लव्ह जिहाद’मध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. हे प्रकार घडू नयेत, म्हणून समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सर्व समाजातील लोकांनी एकत्र यावे ‘समाजामध्ये ‘लव्ह जिहाद’ प्रकारामुळे घडत असलेल्या घटनांना पायबंद घातला पाहिजे. कऱ्हाडकरांनी शनिवारी काढलेला मूकमोर्चा हा फक्त ‘ट्रायल’ होता; मॅच अजून बाकी आहे. यापुढे समाजात ‘लव्ह जिहादा’सारख्या घटना घडू नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्व समाजांतील लोकांनी एकत्र आले पाहिजे. सध्या वशिकरणाचा मुद्दा गंभीर आहे. त्यामुळे विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे,’ असे मत हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष, भाजपचे विक्रम पावसकर यांनी व्यक्त केले. नृत्य प्रशिक्षण देणारे क्लासेस बंद करा! तरुण-तरुणींना एकत्र आणून त्यांच्यात आकर्षण निर्माण करण्यासाठी नृत्य क्लासेसचा उपयोग करून घेतला जात आहे. त्यामुळे अशा प्रकारांना पायबंद घालण्यासाठी शहरातील नृत्याचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसला मुलींना पाठवू नका. नृत्याचे प्रशिक्षण देणारे क्लासेस बंद पाडा, अशी मागणी मोर्चावेळी नागरिकांनी केली.
‘लव्ह जिहाद’विरोधात कऱ्हाडात मूकमोर्चा!
By admin | Published: May 28, 2016 11:46 PM