कोल्हापूर : प्रेमप्रकरणास घरच्यांचा विरोध असल्याच्या कारणातून म्हैशाळ (ता. मिरज) येथील प्रेमीयुगुलाने कोल्हापूर-जोतिबा रस्त्यावरील कुशिरेच्या डोंगरात शुक्रवारी रात्री विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या या पे्रमीयुगुलास नातेवाइकांनी सीपीआरमध्ये दाखल केले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी सांगितले, संजय राजेंद्र मोरे (वय २५, रा. म्हैशाळ, ता. मिरज) हा खासगी नोकरी करतो. तो शुक्रवारी दुपारी जयसिंगपूरला जातो असे सांगून घरातून मोटारसायकलवरून गेला होता. याठिकाणी त्याने घराशेजारी राहणाऱ्या तरुणीला बोलविले होते. तेथून दोघेजण वाडी रत्नागिरी येथे गेले. या ठिकाणी जोतिबाचे दर्शन घेऊन ते कोल्हापूर-जोतिबा रस्त्यावरील कुशिरेच्या डोंगरात आले. या ठिकाणी त्याने रात्री आठ वाजण्याच्या सुमारास भाऊ विजय मोरे यास फोन करून आम्ही दोघे कुशिरेच्या डोंगरावर असून, तुम्ही लवकर या, असे सांगितले. यावेळी विजय याला काहीतरी विचित्र प्रकार असल्याचे वाटले. त्याने वडणगे येथील पाहुण्यांना फोन करून या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी कुशिरेच्या डोंगरात शोधाशोध केली असता दोघेजण बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांना तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. या प्रकाराची दोघांच्याही घरी माहिती देण्यात आली. तेथून दोघांचेही नातेवाईक सीपीआरमध्ये आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. संजय मोरे याच्या घराशेजारीच तरुणी राहत असल्याने त्यांचे एकमेकांच्या घरामध्ये येणे-जाणे होते. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे एकमेकांवर प्रेमसंबंध असल्याचा प्राथमिक अंदाज कोडोली पोलिसांनी वर्तविला असून, त्यांच्या नातेवाइकांकडून माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. (प्रतिनिधी)
प्रेमीयुगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: April 26, 2015 1:02 AM