कोल्हापूर : अनेक बाबतींत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर असताना, मुलींचा जन्मदर मात्र कमी आहे. हे जिल्ह्यासाठी लाजिरवाणे आहे, अशी खंत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केली.जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ आणि बेटी बढाओ’ या योजनेच्या बाहुलीचे लोकार्पण आणि अधिकारी कार्यशाळेचे उद्घाटन मंगळवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी देसाई बोलत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बालविकास सभापती वंदना मगदूम, आरोग्य सभापती सर्जेराव पाटील-पेरीडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, भुयेच्या माजी सरपंच राणी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, आदी उपस्थित होते.महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी यावेळी स्वागत, प्रास्ताविक करून जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबत संगणकीय सादरीकरण केले. जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, मुलगी म्हणजे ‘नकुसा’ ही भावना बदलायला हवी. कायद्याचा धाक आणि सामाजिक जाणीव यांमधून मुलींचे स्वागत व्हायला हवे. त्यासाठी कृती कार्यक्रम करा.शौमिका महाडिक म्हणाल्या, लोकसहभागाशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही. ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ लोकसहभागातून यशस्वी करा. ‘बेटी बचाओ’ ही लोकचळवळ बनली पाहिजे. ती जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे राबवावी. महिलांना संरक्षण देण्याची जबाबदारी केवळ पोलिसांची नाही; तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील मावळ्यांची आहे. ती खात्री तिला द्या.महापालिका आयुक्त डॉ. कलशेट्टी, महिला व बालविकास समितीच्या सभापती श्रीमती मगदूम आणि राणी पाटील यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेला गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, मुख्याधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.