कोल्हापूर : कोल्हापूर शहरात मंगळवारी पावसाचा जोर कमी असला तरी दिवसभर रिपरिप सुरू राहिली. मात्र, जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असल्याने २७ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक अंशत: अन्य मार्गांवरून वळविण्यात आली. गगनबावड्यात अतिवृष्टी सुरूच असून चंदगड, शाहूवाडी, राधानगरी, भुदरगड तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला.सोमवारी (दि. ९) शहरात पावसाची उघडीप असली तरी मंगळवारी दिवसभर रिपरिप सुरू राहिली. जिल्ह्यात इतरत्र पावसाचा जोर असल्याने नद्या, नाले, दुथडी भरून वाहत होते. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली. पन्हाळा तालुक्यातील ठोंभरे व पडसाळी हे लघुपाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. तसेच धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे.
राधानगरी धरणक्षेत्रात ७२, दूधगंगा ६४, तुळशी ९८, कासारी ४५, कडवी ३२, कुंभी ७२, पाटगाव १७०, जांबरे १३४, कोदे धरणक्षेत्रात १३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. परिणामी राधानगरी धरणातून वीजनिर्मितीसाठी पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने प्रतिसेकंद १६०० घनफूट वेगाने पाणी बाहेर पडत आहे.
कुंभी धरणातून प्रतिसेकंद ३५०, कडवीतून १६०, जांबरेमधून ८११, तर कोदेमधून ४९९ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. जिल्ह्यातील तब्बल २७ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक अंशत: अन्य मार्गांवरून वळविण्यात आली आहे. पंचगंगेची दुपारी राजाराम बंधाऱ्यावर पाणीपातळी २७ फुटांवर गेली होती. पंचगंगा नदीच्या विस्तीर्ण पात्रातील पाणी पाहण्यासाठी शहरवासीयांची नदीघाटाच्या परिसरात गर्दी झाली होती.सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात २३.९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६८.५० मिलिमीटर झाला आहे. त्याखालोखाल चंदगडमध्ये ५४.६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-हातकणंगले (१.५०), शिरोळ (०.७१), पन्हाळा (१२.४३), शाहूवाडी (४२.३३), राधानगरी (३९.६७), गगनबावडा (६८.५०), करवीर (७.८१), कागल (८.४३), गडहिंग्लज (४.८५), भुदरगड (२८.६०), आजरा (१७.७५), चंदगड (५४.६६).