पेठवडगाव : वडगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या वांग्याला किलो २७ पैसे भाव मिळाला होता. या नीच्चांकी दराबद्दल अडते व बाजार समितीला आंदोलन अकुंशने धारेवर धरत ठिय्या आंदोलन करण्यात आले. वांग्याला नीच्चांकी दर देणाऱ्या अडत्याचा फेटा आणि वांग्याला हार घालून तसेच ६६ रूपये परत देऊन उपरोधिक सत्कार करण्यात आला. तर संबंधित अडत्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर कार्यकर्ते शांत झाले.विक्रमसिंह जगदाळे हे वडगाव बाजार समितीत ओम चौगुले या अडत्याकडे वांगी विक्रीसाठी पाठवत होते. रोज दर कमी मिळत होता. दरम्यान मंगळवारची पट्टी पाहिली असता, त्यांना धक्काच बसला. २३७ किलो वांग्याला हमाल व वाहतूक खर्च ५२६ रूपये वजा जाता हातात फक्त ६६ रूपये पदरात पडले. दरम्यान अडत्याने परस्पर कमी दरात वांगी विकल्याबद्दल शेतकरी जगदाळे यांची आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, उदय होगले,आप्पासाहेब कदम, अक्षय पाटील, महेश जाधव, बंडू होगले आदींनी सचिव जितेंद्र शिंदे, अडत्या पाणाचंद चौगुले यांच्याकडून माहिती घेतली.धनाजी चुडमुंगे म्हणाले, घाऊक मार्केटमध्ये २० ते ४० रूपये किलो वांगी विक्री केली जाते. मात्र शेतकऱ्यांला मात्र २७ पैसे दर मिळतोय. आजच्या आज अडत्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याबाबत जिल्हा निबंधक यांच्याकडे दाद मागू. बाजार समितीने पारदर्शक व्यवहार करून शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे.विक्रमसिंह जगदाळे म्हणाले, वांगी अडत्याकडे लावल्यानंतर आठवड्याने नीच्चांकी दराची पट्टी आली. हे पाहून धक्काच बसला. प्रत्येक वेळेस वांग्याचा दर कमी कमी लागला आहे. असे झाले तर शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले. कमी दराची माहिती अडत्याने दिली नाही. जर माहिती दिली असती तर वांगी तोड बंद केली असती. अशा लुटीने शेतकरी उद्ध्वस्त होईल.बाजार समितीचे सचिव जितेंद्र शिंदे म्हणाले, शेतकरी व आंदोलन अंकुशच्या तक्रारीची पडताळणी बाजार समितीने केली आहे. या तक्रारीवरून वांगी दरात चूक झाल्याचे दिसून येते. त्यामुळे ओम पाणाचंद ट्रेडिंगचा परवाना स्थगित करत आहोत.
वांग्याला नीच्चांकी दर, कोल्हापुरात अडत्याचा केला उपरोधिक सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2023 12:13 PM