भीमगोंडा देसाई --कोल्हापूर --पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी (जोतिबा) येथील शिवकालीन कर्पूरेश्वर तलावास पर्यटनाचा ‘लूक’ मिळणार आहे. राज्य सरोवर संवर्धन योजनेतून या तलावासाठी २ कोटी ३८ लाख ९० हजार रुपये मंजूर झाले आहेत. कामास प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. शाहूवाडी-पन्हाळ्याचे आमदार सत्यजित पाटील यांनी मंत्रालयीन स्तरापर्यंत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या तलावास शासनाकडून निधी मिळाला आहे. अन्य दोन तलावांचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रसिद्ध आराध्य दैवत म्हणून पुराणकाळापासून श्री जोतिबा प्रसिद्ध आहे. डोंगरावरील वाडी रत्नागिरीची लोकसंख्या ४,७०० इतकी आहे. यात्राकाळासह इतर वेळीही जोतिबा डोंगरावर महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. ग्रामस्थ व बाहेरून येणारे भाविक यांना पाणी व अन्य मूलभूत सुविधा पुरविताना ग्रामपंचायतीवर ताण पडतो.सध्या केर्ली (ता. करवीर) येथून सुमारे १२ किलोमीटर अंतरावरून कासारी नदीतून पिण्यासाठी डोंगरावर पाणी नेले आहे. ४५० मीटर उंचीवर पाणी जात असल्यामुळे तीन ठिकाणी ते विद्युतपंपाने उपसावे लागते.जोतिबा येथे केवळ पाण्यासाठीच्या वीजबिलापोटी वर्षाला १६ ते १७ लाख रुपये खर्च करावे लागतात. ग्रामपंचायतीकडे उत्पन्नाचे ठोस मार्ग नसल्यामुळे विजेचे बिल भरणे अवघड होत आहे. यामुळे डोंगरावर असलेल्या शिवकालीन तलावातील पाण्याचा वापर पिण्यासाठी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.डोंगरावर कर्र्पूरेश्वर, गायमुख, चव्हाण, मुरलीधर, यमाई असे तलाव आहेत. अनेक वर्षांपासून या तलावाच्या देखभाल-दुरुस्तीकडे, नियंत्रणाकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी, पाणी दूषित झाले आहे. तसेच तलावात जलपर्णी वाढली आहे.दरम्यान, शिवकालीन कर्पूरेश्वर, मुरलीधर, गायमुख तलावातून पिण्यासाठी पाणी वापरणे शक्य आहे. याशिवाय तलावाचे सुशोभीकरण, दुरुस्ती, बगीचा तयार केल्यास पर्यटकही रेंगाळतील. त्यामुळे या तीन तलावांना पर्यटनाचा लूक असणारा एन. एस. इंजिनिअरिंग अॅँड एन्व्हायर्न्मेंटल सोल्युशन संस्थेने ेआराखडा तयार केला आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने शासनाकडून निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. संवर्धन योजनेच्या निकषांनुसार दहा टक्के लोकवर्गणी आणि उर्वरित शासनाचा निधी मिळणार आहे. तलावासाठी निधी देताना जैवविविधता, पर्यावरण अशा अनेक अंगांनी विचार होतो. तलावाचे काम पूर्ण झाल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. काय कामे होणार? तलावातील गाळ काढणे, परिसराची स्वच्छता करणे, तलावाच्या भिंतीचे बांधकाम करणे, पदपथ तयार करणे, संरक्षक भिंत बांधणे, वृक्षारोपण करणे, सौरऊर्जेद्वारे पाणीवापर सुविधा उपलब्ध करणे, सांडपाणी व्यवस्थापन व बाग तयार करणे, अशी महत्त्वाची कामे केली जाणार आहेत.कर्पूरेश्वर तलावासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे. निविदेची प्रक्रिया पूर्ण करून महिन्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.- जी. डी. काटकर, उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा
शिवकालीन तलावास पर्यटनाचा लूक
By admin | Published: February 05, 2016 11:23 PM