कोल्हापूर : लॉकडाऊन वाढविल्याच्या घोषणेनंतर पहिल्याच दिवशी मंगळवारी सकाळी कोल्हापूर शहरात नागरिकांनी धान्य, भाजीपाला, आदींच्या खरेदीसाठी, तर बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारनंतर पोलिसांच्या कडक भूमिकेमुळे रस्त्यांवरील वर्दळ दिसेनाशी झाली.शहरातील शुक्रवार पेठ पोलीस चौकी चौक, लक्ष्मीपुरी धान्य बाजार, सुभाष रोड, राजारामपुरी, साने गुरुजी वसाहत, शाहूपुरी, आदी भागांमध्ये नागरिकांनी सकाळी धान्य व भाजीपाला खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी केली होती.
काही ठिकाणी दोन व्यक्तींमधील सामाजिक अंतर ठेवून व्यवहार सुरू असल्याचे चित्र, तर काही ठिकाणी याचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. अनेकांनी यापुढील दिवसांत लॉकडाऊन कडक केला तर अन्नधान्याची साठवणूक घरी हवीच म्हणून खरेदीसाठी किराणा व धान्य दुकानांमध्ये गर्दी केल्याचे दिसत होते. राष्ट्रीयीकृत बँकांसह जिल्हा बँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या. याशिवाय पोस्टातही जनधन खात्यामधील पैसे काढण्यासाठी रांगा लागल्या होत्या.
या रांगा अगदी शिस्तबद्धपणे सामाजिक अंतर ठेवून लागल्या होत्या. भाजीपाला खरेदीसाठी मात्र सामाजिक अंतर राखले जात नव्हते. शहरातील राजाराम रोड, सुभाष रोड, खासबाग मैदान, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, बिनखांबी गणेश मंदिर, खरी कॉर्नर, गुजरी कॉर्नर, पापाची तिकटी, शाहूपुरी व्यापारी पेठ, राजारामपुरी मेन रोड, स्टेशन रोड, आदी गजबजलेल्या रस्त्यांवर तुरळक प्रमाणात दुचाकीसह चारचाकी वाहने फिरत होती. विशेषत: पोलिसांच्या कारवाईमुळे अनेकांनी चालत जाणेच पसंत केल्याचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळाले; तर बाजारपेठेत टेम्पो, छोटे ट्रक, आदींमधून तांदूळ, ज्वारी, तूरडाळ, आदींची ने-आण सुरू असल्याचे चित्र पाहण्यास मिळाले.
शहरातील काही भागांत जणू नेहमीप्रमाणेच व्यवहार सुरू असल्याचे चित्र होते. यात विशेषत: काही नागरिक हातात पिशवी घेऊन चौकाचौकांत बोलत उभे होते. त्यामुळे लॉकडाऊन वाढविल्यानंतर त्याचा फज्जा तर उडाला नाही ना, असा सवाल अनेकांना पडला होता. दुपारनंतर प्रत्येक चौकात पोलीस येणाऱ्या-जाणाºया नागरिकांना बाहेर फिरण्याचे कारण विचारीत होते. विशेषत: दुचाकीवरून फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात होता. अनेक नागरिक कारवाई झाल्यानंतर सोडण्यासाठी अनेकांच्या राजकीय वशिल्याबरोबर गयावयाही करीत असल्याचे चित्र सर्रास पाहण्यास मिळाले. त्यामुळे दुपारनंतर या सर्व भागांत शुकशुकाट पसरला.
चटणीची तजवीजमार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत वर्षभर घरी लागणाºया कांदा-लसूण चटणीची तयारी केली जाते. त्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी लक्ष्मीपुरी परिसरातील मिरची बाजारात गर्दी केली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.