समीर देशपांडे ।देशात प्रत्येक तीन मिनिटांनी ‘टीबी’ (क्षयरोग)ने दोन रुग्णांचा मृत्यू होतो. टीबी ही भारतातील एक प्रमुख सामाजिक आरोग्य समस्या बनली असून सहा हजार व्यक्तींना नव्याने टीबी होतो. जागतिक आरोग्य संघटनेने २०३० पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; तर केंद्र सरकारने २०२५ पर्यंत ‘टीबीमुक्त भारत’ अशी घोषणा केली आहे. १० ते २४ आॅक्टोबर या कालावधीत प्रत्यक्ष गृहभेटी देऊन ‘टीबी’ची तपासणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार यांच्याशी साधलेला हा संवाद...
प्रश्न : टीबीची लक्षणे कोणती ?उत्तर : दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप, छातीत दुखणे, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकीवाटे रक्त पडणे ही टीबीची लक्षणे आहेत. सातत्याने ताप येत असेल आणि खोकला सुरू असेल, वजन प्रमाणापेक्षा कमी होत असेल तर तो टीबी असू शकतो.
प्रश्न : ही लक्षणे आढळल्यास नागरिक, ग्रामस्थांनी काय करावे ?उत्तर : सर्व शासकीय दवाखाने किंवा त्यांच्या इच्छेनुसार खासगी दवाखान्यात बेडका तपासायला देणे आवश्यक आहे. शक्य तेथे एक्स-रे काढले जातील. सीबीनेट तपासणी हा एक भाग आहे. त्यासाठी शासनाने ४५ लाख रुपयांचे एक अशी चार मशीन्स बसवली आहेत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय, इचलकरंजी येथील आयजीएम, सीपीआर हॉस्पिटल आणि सावित्रीबाई फुले हॉस्पिटल येथे ही मशीन्स आहेत. तेथे टीबी झाला आहे की नाही , कोणत्या टप्प्यातील आहे, याचे निदान करता येते.
प्रश्न : टीबी रुग्णशोध मोहिमेचे स्वरूप काय ?उत्तर : जिल्ह्यात १० ते २४ आॅक्टोबर २०१९ या दरम्यान टीबी रुग्ण शोधमोहीम राबविण्यात येणार आहे. झोपडपट्टी, स्थलांतरित वस्त्या, औद्योगिक कामगार, असंघटित कामगार, दगड फोडणारे, खाणीमधील कामगार वस्त्या अशा ठिकाणी जाऊन हे काम केले जाणार आहे. जिल्ह्णातील ७५९४०२ इतक्या घरांमधील ३४ लाख १७ हजार ३०६ जणांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी ५३१० कर्मचारी काम करणार आहेत.आहाराला कितपत महत्त्व आहे?टीबीच्या रुग्णांसाठी आहार महत्त्वाचा आहे. हिरव्या भाज्या, कडधान्ये, अंडी हा आहार घेणे आवश्यक आहे. चांगली प्रथिने मिळतील असा आहार या रुग्णांनी घेण्याची गरज आहे. आपला आजार आणि त्याविषयीची घ्यावयाची काळजी यांचा अभ्यास करावा.
अशा रुग्णांनी काय करू नये?इतरांना संसर्गातून होणारा असा हा आजार असल्याने टीबी झालेल्या रुग्णांनी ‘कफ एटिकेट्स’ पाळण्याची गरज आहे. खोकताना, शिंकताना, बोलताना तोंडावर रुमाल धरावा. ऊठसुट कुठेही थुंकू नये. कोणतेही व्यसन करू नये.जिल्ह्यातील टीबी रुग्णांची संख्याजिल्ह्णात २०१५ साली २६२१, २०१६ साली २४१६, २०१७ साली २३७१, २०१८ साली २१३३ आणि २०१९ च्या सहा महिन्यांमध्ये १०९७ इतके टीबीचे रुग्ण आढळले आहेत. शाहूवाडी तालुक्यात हे प्रमाण अधिक आढळते. ज्या टीबी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
टीबी (क्षयरोग) म्हटले की तो केवळ फुप्फुसालाच होतो असा गैरसमज आहे. केस , नख सोडून सर्व अवयवांना ‘टीबी’ची लागण होऊ शकते. चांगले उपचार उपलब्ध करून दिले असले तरी याबाबत दक्षता घेण्याची गरज आहे : डॉ. उषादेवी कुंभार, जिल्हा क्षयरोग अधिकारी