कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील कला, वाणिज्य, विज्ञान विद्याशाखेच्या एम. फिल आणि पीएच.डी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा दि. १४ आणि १५ मे रोजी ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. त्यासाठी पात्र ५५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने या प्रवेश परीक्षेचे अंतिमपूर्व वेळापत्रक तयार केले आहे. त्यात दि. १४ मे रोजी व्यावसायिक अर्थशास्त्र, वाणिज्य, शिक्षणशास्त्र, व्यावसायिक व्यवस्थापन, वनस्पतीशास्त्र, फार्मसी, राज्यशास्त्र, आदी १५ अभ्यासक्रमांच्या, तर दि. १५ मे रोजी पर्यावरणशास्त्र आणि अभियांत्रिकी, प्राणीशास्त्र, गृहशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, रसायनशास्त्र, हिंदी, इंग्रजी, भूगोल, मराठी, संगणकशास्त्र आणि अभियांत्रिकी, आदी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा १५ अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा होणार आहेत. सकाळी दहा ते दुपारी बारा, दुपारी एक ते तीन आणि दुपारी चार ते सायंकाळी सहा या सत्रांमध्ये परीक्षा होतील. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर या परीक्षांचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. त्याबाबत काही आक्षेप, त्रुटी असल्यास त्याबाबतचे ई-मेल विद्यापीठाच्या परीक्षा नियुक्ती विभागाकडे शुक्रवार (दि.५) पर्यंत पाठविण्यात यावेत. त्यानंतर आलेली कोणतीही तक्रार ग्राह्य धरली जाणार नाही. या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले जाईल, असे परीक्षा मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी बुधवारी सांगितले.
चौकट
एमसीक्यू स्वरूप
या परीक्षेसाठी एमसीक्यू स्वरूपातील प्रश्नपत्रिका असणार आहे. ती सोडविण्यासाठी दोन तासांचा कालावधी दिला जाणार आहे.