लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरडे नदीपात्र आणि खोरं पाटीने वाळू उपसा या दोन नियमांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील नदी-धरण क्षेत्रातील वाळू उपसा गेल्या तीन वर्षांपासून बंद आहे. सन २०१६-१७ मध्ये वाळू घाट लिलावातून जिल्हा प्रशासनाला १७. ५९ कोटींचा महसूल मिळाला आहे. जिल्ह्यातील नद्या बारमाही वाहतात. त्यात पंचगंगा प्रदूषित असल्याने हरित लवादाच्या निकषानुसार येथे वाळू उपसा होऊ शकत नाही, असे विभागाने शासनाला कळविले आहे.
बेसुमार वाळू उपशामुळे राज्यातील अनेक नद्यांची इको सिस्टीम धोक्यात आली असून अनेक नद्यांची पात्रे बदलली आहेत. जलचर प्राणी धोक्यात आले आहेत. कृत्रिम पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीत पाणी घुसून शेतीचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा रिॲलिटी चेकमधून घेण्यात आला. जिल्ह्यात वारणा, दुधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी, कृष्णा या पाच नदी घाटांवर वाळू लिलाव केला जात होता. हा वाळू उपसा सक्षम पंपाद्वारे व्हायचा. त्यामुळे नदीपात्रात पाणी असले तरी वाळू उपसा होत होता. मात्र, हरित लवादाने १९ एप्रिल २०१७ रोजी राज्यात सक्षम पंपाद्वारे वाळू उपशावर बंदी आणली. त्यामुळे २१ एप्रिल २०१७ पासून कोल्हापूर जिल्ह्यातील वाळू उपसा थांबविण्यात आला.
पुढे हरित लवादाने ३ सप्टेंबर २०१९ रोजी जिथे नदी पात्र कोरडं असेल तिथे खोरं आणि पाटीने वाळू उपशाला परवानगी दिली. मात्र, जिल्ह्यात नद्या बारमाही वाहतात. त्यातही बंधारे, लहान मोठे धरण असल्याने नदीचे पात्र कोरडे पडत नाही. दुसरीकडे पंचगंगा नदी प्रदूषित असल्याने तेथील वाळू उपसा करायचा नाही असे निर्देश आहेत. त्यामुळे जिल्ह्यात वाळू उपसा होणार नाही असे खनिकर्म विभागाने शासनाला कळविले आहे.
--
लिलावात गेलेले वाळू घाट तालुका निहाय
प्रशासनाने २०१६-१७ मध्ये पाच नद्यांचे ९६ वाळू घाट व १ लाख ४२ हजार ७३० ब्रास वाळू लिलावासाठी प्रस्तावित केले होते. त्यापैकी ३६ वाळू घाटांचा यशस्वी लिलाव झाला. यात ५४ हजार ६९४ ब्रास वाळूचा लिलाव झाला.
शिरोळ : २२
कागल : २
गडहिंग्लज : ३
हातकणंगले : ४
पन्हाळा : ६
-----
अन्य जिल्ह्यातून वाळू
जिल्ह्यात मात्र वाळूची मागणी आणि पुरवठ्यात मोठी तफावत आहे. त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीतून सिलिका सॅन्ड ही वाळू येते. जी मुख्यत्वे फौंड्री उद्योगासाठी वापरली जाते. बऱ्याचदा याच वाळूवर प्रक्रिया करून ती बांधकामासाठी वापरली जाते. यासह गुजरात व कर्नाटकातून वाळू दाखल होते.
---
सॅन्ड स्टोनचा सक्षम पर्याय
वाळू म्हणजे नदीपात्रातील काळी वाळू असा लोकांचा गैरसमज आहे. अनेक जिल्ह्यात तेथील दगडाच्या प्रकारानुसार वाळू मिळते. कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांचा येथेच उगम होतो. सध्या चंदगड, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज याठिकाणी कॉडस कॉडझॅक्ट, सॅन्ड स्टोनपासून वाळू बनविली जाते, ज्याचा रंग पांढरा, तांबडा-लालसर, चॉकलेटी असा मिश्र असतो. ही वाळू काळ्या वाळूइतकीच दर्जेदार असते जी बांधकामासाठी वापरता येते. अलीकडे याच वाळूचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.
--
८ खाणपट्टे मंजूर
सॅन्ड स्टोनसाठीचे चंदगडमध्ये ८ व आजऱ्यामध्ये २ खाणपट्टे मंजूर करण्यात आले आहेत. तर २५ खाणपट्टे मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. असे असले तरी चोरून दुर्गम भागात चोरुन वाळू उपसा करण्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. ज्यावर प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली आहे.
---