दत्तात्रय पाटील- म्हाकवे (ता. कागल) येथील गरिबांच्या धान्यावर उंदीर आणि घुशींचीच मक्तेदारी आहे. धान्य वितरण प्रणालीच्या ढिसाळ नियोजनामुळे धान्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. गोदामात धान्य अस्ताव्यस्त पडलेले अन् त्यामध्ये घुशींच्या लेंड्या पडलेल्या असतात. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो; परंतु याकडे ना ग्रामपंचायत, ना तलाठी, ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ आहे. कागल तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाची म्हाकवे येथे शाखा असून, त्यांच्यामार्फत गावकऱ्यांना धान्य वितरण केले जाते. येथील बसस्थानकाच्या दक्षिण बाजूला गावाच्या मध्यभागी खासगी इमारतीत भाडेतत्त्वावर या शाखेचे कार्यालय आहे. २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधलेली इमारत अत्यंत जीर्ण झाली आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी या इमारतीला गळतीही लागते.घुशींनी मोठमोठे खड्डे पाडून इमारतीच्या भिंतींना भगदाडेच पाडली आहेत. या घुशी धान्यांची पोती कुरतडून धान्य फस्त करतात.लक्ष कोण देणार?गावात सुमारे ६३० पर्यंत अन्नधान्य योजनेतील लाभार्थी असून, केसरी कार्डधारक ४०० पेक्षा जास्त आहेत. राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणूनही या गावाची ओळख आहे. मात्र, ग्रामस्थांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला एकही राजकीय नेता पुढे येत नाही, ही आश्चर्यकारक बाब आहे.घुशींमुळे धान्याची नासाडी होत आहे ही वस्तुस्थिती आहे. याबाबत आम्ही वरिष्ठांना लेखी तसेच तोंडी कळविले आहे. त्याचबरोबर इमारत मालकालाही इमारतीची डागडुजी करून देण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत. पर्यायी आणि प्रशस्त जागा उपलब्ध होत नसल्यामुळे आम्ही अगतिक आहोत.- नामदेव खतकर, शाखाधिकारी,
म्हाकवेत धान्य गोदामात घुशी
By admin | Published: December 25, 2014 12:25 AM