कागल : कापशी खोऱ्यातील डोंगराळ भागात असणाºया माद्याळ ग्रामपंचायतीने कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ई-ग्रामपंचायत होण्याचा बहुमान पटकावला आहे. या कामगिरीबद्दल शनिवारी पंचायत समितीच्या सभागृहात सभापती राजश्री माने, उपसभापती विजय भोसले यांच्या हस्ते सरपंच आणि सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी शबाना मोकाशी आणि सदस्य उपस्थित होते.
ग्रामपंचायती पेपरलेस करण्यासाठी शासनाने ई-ग्राम सॉफ्टवेअर प्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामपंचायत कारभारात गतिमानता आणि पारदर्शकता देण्याबरोबरच कागदाचा कमीत कमी वापर, तसेच हस्तलिखित कामाचा कमी वापर करणे, असा यामागचा हेतू आहे. गेल्या एप्रिल महिन्यापासून हे काम राज्यभर युद्धपातळीवर सुरू आहे. राज्यात अनेक ग्रामपंचायती पेपरलेस होत असून, कोल्हापूर जिल्ह्यातीलही काही ग्रामपंचायती या मार्गावर असून कागल तालुक्यातील माद्याळ ग्रामपंचायतीने सर्वांत प्रथम हा मान मिळविला आहे. पंचायत समितीमध्ये झालेल्या सत्कारावेळी सरपंच नीता सुतार, उपसरपंच बाळासाहेब राणे, ग्रामसेवक एन. के. कुंभार, सोनुसिंह घाटगे, प्रकाश राऊत, गजानन आसोदे, कल्पना काशीद, जयमाला घोरपडे, मनीषा शिंदे, सुगंधा संकपाळ, विद्या ढोणुक्षे, संगणकचालक अजित चौगुले, गंगाराम परीट, आदी उपस्थित होते.
मार्चअखेर सर्व ग्रामपंचायती पेपरलेसई-ग्राम सॉफ्टवेअर प्रणालीचा उपयोग कागल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये पहिल्यांदा राबविण्यात आला आहे. त्यामध्ये माद्याळ ग्रामपंचायतीने चांगली कामगिरी बजावली आहे. उर्वरित नऊ ग्रामपंचायती या डिसेंबरअखेर पेपरलेस होतील.तालुक्यातील ७३ ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली सुरू करून मार्च २0२0 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी दिली.
माद्याळ गावची लोकसंख्या ४0२५ इतकी आहे. १३३ प्रकारचे नमुने आणि स्थापनेपासूनची कागदपत्रे, माहिती पुस्तके, पावत्या, आदी महत्त्वाचा दस्तावेज संगणकीकृत करून ठेवला आहे.आता जुन्या माहितीसाठी अथवा कागदपत्रांसाठी कोणती शोधाशोध करावी लागणार नाही. एका क्लिकवर हवा तो कागद समोर येणार आहे, अशी माहिती ग्रामसेवक एन. के. कुंभार यांनी दिली.