शिवाजी सावंत ल्ल गारगोटीचप्पल बनविण्याच्या कलेने भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक गावाचे नाव जगाच्या नकाशात ठळक बनले आहे. अगदी अमेरिकेपासून ते भारतातल्या सर्व प्रमुख शहरात ही चपले वापरली जातात. ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्योगपती अनिल अंबानी यांच्यापासून ते एखाद्या गरीब शेतकऱ्याच्या पायात ही चप्पल मोठ्या रुबाबात खुलून दिसते. कलेची कदर करणारी व्यक्ती ही चप्पल वापरल्याखेरीज राहू शकत नाही. व्यक्तिमत्त्व खुलावणारे हे चप्पल सौंदर्यात जितकी भर घालते त्यापेक्षाही अधिक आरोग्यासाठी हितकारक आहे. देशी-विदेशी चप्पल कंपनीच्या भडिमारात स्वत:चे वेगळे अस्तित्व टिकवून हस्तकलेचा उत्तम नमुना असलेल्या मडिलगे येथील चपलाने आपला वेगळा ठसा कायम ठेवला आहे. अनेक देशांत झालेल्या प्रदर्शनातही येथील चपलाने वाहवा मिळविली आहे. वाढती मागणी आणि ही चप्पल तयार करणारे कारागीर कमी, अशी सध्या येथील व्यवसायाची अवस्था आहे. तरीदेखील सांगितलेल्या वेळेतच चप्पल देण्याची खासियत त्यांनी जपली आहे. कोल्हापुरी चप्पलमध्ये कोल्हापुरी, कापशी, कुरुंदवाडी ही पुरुषांसाठी, तर महिलांसाठी चपली, मोठी वेणी, कोल्हापुरी लेडिज, जरीवेणीत कापशी हे प्रकार प्रसिद्ध आहेत. चामडी चप्पलचे हे प्रकार कमीअधिक प्रमाणात सर्वत्र बनविले जात असले तरीही मडिलगे बुदु्रक येथील कारागिरांनी या कलेत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीच्या काळात दहा ते पंधरा कुटुंबे चप्पल बनवीत होती. परंतु, आजघडीला केवळ दोन-तीन कुटुंबातील व्यक्ती ही एक कला म्हणून चप्पल बनवीत आहेत. यामध्ये धनाजी व बानाजी बळवंत चव्हाण या दोघा बंधूंचा या व्यवसायात हातखंडा आहे. पायाचे मोजमाप जागेवर घेतल्यामुळे पायाच्या आकारमानानुसार चप्पल तयार होते. उच्चदर्जाचे चामडे, आकर्षक बांधणी, घडी न पडणारे चामडे, वजनाला १०० ग्रॅम पासून ते एक किलोपर्यंत, चामडे चांगले घोटविल्यामुळे त्याची चमक व टिकाऊपणा वाढतो, पट्ट्यावर असणारी वेणी ही घरातील महिला तयार करतात त्यामुळे त्यात एक प्रकारचा नाजूक व देखणेपणा असतो. एक चप्पल तयार करण्यासाठी किमान तीन दिवसांचा कालावधी लागतो. या चप्पलची शिलाई चामडी धाग्यापासून केली जाते. ही चप्पल किमान तीन ते चार वर्षे टिकते. हस्तकलेच्या उत्तम आविष्कारातून साकारलेली ही वस्तू साहजिकच देखणी आणि आकर्षक होऊन गिऱ्हाईकांच्या मनात स्थान निर्माण करते. याबाबत माहिती देताना गंगापूर येथील चप्पल शौकीन अजित पाटील म्हणाले की, पूर्वीपासून ग्रामीण भागातील शेतकरी वर्गात गरजेचे असलेले हे चप्पल कारागिरांनी कसब पणाला लावल्यामुळे तरुण वर्गापासून आबालवृद्धापर्यंत सर्वांना आवडू लागले आहे. पायात असूनदेखील डोळ्यांपासून केसांपर्यंत आराम देणारे हे मडिलगेचे चप्पल आहे. (प्रतिनिधी) महाराष्ट्रात कोल्हापुरी चप्पलला तोड नाही लाकडापेक्षा जनावराच्या चामड्यापासून बनविलेले चप्पल पायांना व शरीराला आवश्यक असणारी शितलता प्रदान करते. परंतु, प्रक्रिया न केलेले चामडे दीर्घकाळ टिकत नाही. मग त्याचा शोध सुरू झाला. यातून मग चामडे कमाविणाऱ्या जाती निर्माण झाल्या व त्यातूनच चप्पल बनविण्याची कला विकसित झाली व याला व्यवसायाचे स्वरूप आले. चप्पल बनविणारे कारागीर विखुरले गेले. प्रांतवार वेगवेगळ्या प्रकारची चप्पल बनविली जातात. भारतात विशेषत: काश्मिरी, राजस्थानी, पंजाबी, महाराष्ट्रीयन या राज्यांतील चप्पल प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात ‘कोल्हापुरी चप्पल’ला तोड नाही. नवीन तरुणांचीव्यवसायाकडे पाठहा व्यवसाय करणारी ही शेवटची पिढी ठरणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव सर्व ठिकाणी झाला असून, चप्पल क्षेत्रसुद्धा त्याच्यापासून अलिप्त राहू शकले नाही. तरुण वर्गांना सँडल आणि ब्रँडेड बुटांची आवड असल्यामुळे दिवसेंदिवस चामडी चपलांची गिऱ्हाईक कमी होत आहेत. असे असले तरी कौशल्य असलेल्या कारागीराच्या चप्पलांना हौशी ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. मात्र, कारागीर, मजूर यांची वाणवा व हा व्यवसाय शिकण्यासाठी नव्या पिढीतील तरुणांनी फिरविलेली पाठ यामुळे ही कला संपण्याच्या मार्गावर आहे. कच्चा माल परदेशी जाऊ लागल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कच्च्या मालाचा तुटवडाही जाणवू लागला आहे.ग्राहकाच्या हौसेवर किंमतचपलाच्या किमतीसाठी कोणताही निश्चित मापदंड नाही. ग्राहकाच्या नजरेवर व हौसेवर त्याची किंमत ठरते. काही चपलांना पाच हजारांपासून दहा हजारांपर्यंत किंमत मिळते. काहीजण यावरही स्वखुशीने पैसे देणारेही आहेत. मात्र, अशा कलाकुसरीची चपले सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत.
मडिलगेचे ‘चप्पल’ वापरायला अव्वल !
By admin | Published: May 01, 2017 12:58 AM