अनिल पाटील
मुरगूड :- सुमारे पन्नास वर्षांपासून अंबाबाई देवीची सेवा गोंधळ मांडून करणाऱ्या यमगे ता कागल येथील निष्ठावंत सेवेकर मधुकर कृष्णात गोंधळी यांचा मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास गोंधळ सुरू असतानाच ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. मधुअण्णांच्या अचानक जाण्याने यमगे सह पंचक्रोशी हळहळली.
हिंदू धर्मात लग्न कार्य झाल्यानंतर ग्राम दैवत अंबाबाई देवीचा गोंधळ घालण्याची प्रथा आहे. त्यानुसार अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात सुमारे पाच हजार गोंधळ जागरण करण्याचा जणू विक्रम यमगे ता कागल येथील गोंधळी कुटूंबाने केला आहे.मू ळ गाव हळदी असलेले हे कुटुंब गेले अनेक वर्षांपासून यमगे येथे स्थायिक आहे.यातील मधुकर गोंधळी हे हरहुन्नरी कलाकार म्हणून सर्वांना परिचित होते.त्यांची गोंधळ मांडण्याची पद्धत,दिवट्या करण्याची पद्धत,संभळ वाजवण्याची पद्धत वाखाण्याजोगी असल्याने त्यांना मोठी मागणी होती.चेहऱ्यावर कायम हास्य, सर्वांची अदबीने केलेली चौकशी यामुळे तर ते आबालवृद्धामध्ये प्रिय होते.
मंगळवारी हळदी ता कागल येथे एका लग्नकार्यात गोंधळ मांडण्याचे काम सुरू होते. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खाली कोसळले.तिथेच त्यांचा मृत्यू झाला.ही बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.बुधवारी पहाटे यमगे येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.देवाची अखंड सेवा करण्याऱ्या सेवेकराचा देवाची सेवा करताना झालेला मृत्यू हा अनेकांना चटका लावून गेला.त्यांच्या मागे त्यांना गोंधळ कामात मोलाची साथ देणारे त्यांचा मुलगा अंबाजी,भाऊ परशराम व पुतणे रणजित आणि संदीप तसेच पत्नी,मुलगी असा मोठा परिवार आहे.