कोल्हापूर : नेत्यांच्या गळतीमुळे हवालदिल झालेल्या कॉँग्रेस पक्षाकडे ‘कोल्हापूर उत्तर’साठी सक्षम उमेदवाराची कमतरता जाणवत असून, उमेदवारीचे घोडे सध्या तरी वाड्यावरच अडखळले आहे. मधुरिमाराजे यांच्याकरिता कॉँग्रेस कार्यकर्त्यांचा आग्रह असला तरी ‘न्यू पॅलेस’कडून अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. मात्र कॉँग्रेस पक्ष तसेच कार्यकर्त्यांकडून त्यांची मनधरणी सुरूच आहे.‘कोल्हापूर उत्तर’मधून युवा नेते ऋतुराज संजय पाटील लढणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर नवीन सक्षम उमेदवाराचा शोध सुरू झाला. पक्षाकडे दौलत देसाई, सागर चव्हाण, सचिन चव्हाण यांच्यासारख्या नव्या दमाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीचा आग्रह धरला असला तरी पक्षनेतृत्व आणखी एखादा सक्षम उमेदवार मिळतो का, याची चाचपणी करीत आहे. माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या व माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांचे नाव चर्चेतून पुढे आले आहे.शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी मधुरिमाराजे याच चांगल्या प्रकारे लढत देऊन पक्षाला विजय मिळवून देतील, अशी आशा पक्षाचे कार्यकर्ते तसेच स्थानिक नेते व्यक्त करीत आहेत. मालोजीराजे यांचे कार्यकर्ते स्वत: पुढाकार घेऊन मधुरिमाराजे यांना कॉँग्रेसची उमेदवारी घ्या, असा आग्रह करू लागले आहेत; परंतु त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय राजपरिवारात झालेला नाही. द्विधा मन:स्थितीत असलेल्या या परिवाराकडून चाचपणी मात्र सुरू आहे.यापूर्वी मालोजीराजे यांचा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव आणि पाठोपाठ संभाजीराजे छत्रपती यांचा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा स्वकियांकडूनच अधिक झाला असल्याचा समज झाल्यामुळे, पुन्हा तशीच परीक्षा कशाकरिता द्यायची? असा सवाल या परिवारासमोर आहे. शिवाय गेल्या पाच वर्षांत कोणत्याच सार्वजनिक कामात नसताना आणि लोकांशी संपर्क नसताना अचानक निवडणुकीत उतरलो तर मतदार कितपत प्रतिसाद देतील, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.‘न्यू पॅलेस’वरून मधुरिमाराजे यांच्या उमेदवारीचा निर्णय लवकर होत नसल्यामुळे कॉँग्रेस कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. उमेदवारीचे घोडे त्यांच्या होकारावरच अडून राहिले आहे. जोपर्यंत स्पष्टपणे नाही म्हणून सांगितले जात नाही, तोपर्यंत कॉँग्रेस पक्षही त्यांच्याबद्दल अपेक्षा बाळगून आहेत.दुसरे प्रमुख दावेदार युवा नेते दौलत देसाई यांनी कॉँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. आमदार सतेज पाटील यांच्यावर त्यांची भिस्त आहे. तेच आपल्याला न्याय देतील, अशी त्यांना आशा आहे. राज्य पातळीवरील काही मान्यवर नेतेमंडळींमार्फतही त्यांनी प्रयत्न चालविले आहेत.
माजी महापौर प्रल्हाद चव्हाण यांचे पुत्र माजी महापौर सागर चव्हाण व सचिन चव्हाण यांची नावेही चर्चेत आहेत. एकीकडे कॉँग्रेसची साथ सोडून मोठे नेते बाहेर पडत आहेत. त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत म्हणून आम्हाला संधी देतील, अशी त्यांना अपेक्षा आहे. ज्यांना यापूर्वी पक्षाने उमेदवारी दिली ते महादेवराव आडगुळे, मालोजीराजे, सत्यजित कदम आज पक्षात नाहीत ही एक बाजू असताना, पक्षाने निष्ठावंतांची कदर करावी, अशी चव्हाण परिवाराची मागणी आहे.