कोल्हापूर : गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील दोन वाडे चर्चेत आले होते. एक होता नवीन राजवाडा आणि दुसरा होता गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडीचा वाडा. मधुरिमाराजे आणि नंदाताई बाभूळकर यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडून आपण विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नसल्याचे बुधवारी स्पष्ट केले आहे तसे माघारीचे खलितेच त्यांनी धाडले आहेत.कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचा एक आदरयुक्त दबदबा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. स्वच्छ प्रतिमा, राजघराण्याचे वलय असूनही मालोजीराजे यांनी सन २००४ मध्ये विधानसभा लढवून बाजी मारली हा अपवादवगळता लोकसभेच्या एका आणि विधानसभेच्या एका निवडणुकीत या घराण्यातील सदस्यांना पराभव स्वीकारावा लागला.
आताही विधानसभेसाठी मालोजीराजे यांच्या पत्नी आणि दिवंगत मंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या कन्या मधुरिमाराजे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. खानविलकर समर्थकांनी मेळावाही घेतला होता. निवडणूक लढवाच, असा त्यांना आग्रह होता; परंतु लढण्याबाबत कोणतेच स्पष्टीकरण वाड्यावरून दिले जात नसल्याने संभ्रम वाढला होता. मात्र, बुधवारी मालोजीराजे यांनी फेसबुकवरून स्पष्टीकरण देत या सर्व चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
दुसरीकडे, असेच वातावरण गेले महिनाभर बाबासाहेब कुपेकर यांच्या कानडेवाडीतील वाड्यावर होते. संध्यादेवी कुपेकर लढणार नसल्याने यावेळी नंदाताई बाभूळकर रिंगणात असतील, अशीच अटकळ होती. मात्र, चंदगडची जागा नेमकी कुणाला सुटणार आणि भाजप आपल्याला कधी प्रवेश देणार हा अंदाज घेत खूप वेळ गेला आणि संध्यादेवी आणि नंदाताई यांना निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर करावे लागले. त्यानंतरही कार्यकर्ते भावनिक झाले आणि वेळ पडल्यास पुन्हा निवडणूक लढविण्याची घोषणा नंदाताई ना करावी लागली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दोनवेळा कुपेकर वहिनींना भेटून गेले.
परंतु अखेर चंदगडची जागा शिवसेनेला सुटली. त्यातच चुलतभाऊ संग्रामसिंह यांची उमेदवारी जाहीर झाली आणि अखेर आम्ही दोघी राजकारणातून बाजूला होत असल्याचे पत्र नंदाताई नी लिहिले आहे. अशा पद्धतीने या दोन्ही विषयांवर अखेर पडदा पडला आहे.जिल्हा नेतृत्वाची विरोधकांना ताकदबाभूळकर यांच्या या पत्रामध्ये जिल्हा नेतृत्वावरही रोष व्यक्त केला आहे. संघटना मजबूत स्थितीमध्ये असतानाही दुर्दैवाने जिल्हा नेतृत्वाने आपल्या विरोधकांना सातत्याने ताकद देऊन आपले मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.
यावेळी निवडणूक लढविण्यासाठी अत्यंत पोषक आणि सकारात्मक वातावरण आहे, याची आम्हाला जाणीव आहे. अशा परिस्थितीत कोल्हापूरमधून मधुरिमाराजे छत्रपती यांची उमेदवारी असावी हा जनमानसाचा कौल होता; परंतु व्यक्तिगत कारणांमुळे आम्ही अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला आहे.- मालोजीराजे छत्रपती / मधुरिमाराजे छत्रपती
बदल हा निसर्गाचा नियम आहे. माझा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे. आजपर्यंतकै. दादा, आईसाहेब व मी स्वत: हा विकासाचा जगन्नाथाचा रथ आपल्या सर्वांसोबत पुढे नेला आहे. आता इथून पुढचा प्रवास नवीन नेतृत्वाखाली व्हावा. या वळणावर आपण सर्वांनी आम्हाला प्रेमाने निरोप द्यावा, ही विनंती.
- डॉ नंदिनी बाभूळकर