कोल्हापूर : ‘मॅगी’मध्ये शरीराला अपायकारक पदार्थ आढळल्याने देशपातळीवर ‘मॅगी’वर बंदी घालण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून पाठविलेल्या नमुन्यांपैकी सहा नमुन्यांत मोनोसोडियम व जस्त या धातूंचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ‘मॅगी’च्या घाऊक विक्रेत्यांकडील २६ लाख १८ हजार ६२ रुपयांचा माल कंपनीला परत पाठविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने दिले होते. त्यानुसार या व्यापाऱ्यांनी ‘मॅगी’चा साठा परत पाठविला आहे. देशभरात ‘मॅगी’ बाजारातून मागे घेण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून अन्न औषध प्रशासन खात्याने ७ जूनपासून कारवाईस सुरुवात केली आहे. त्यानुसार कोल्हापुरातील ‘मॅगी’च्या घाऊक व्यापाऱ्यांकडून ९ जूनपर्यंत २६ लाख १८ हजार ६२ रुपयांच्या मालाची परत पाठवणी केली. हा साठा अन्न औषध प्रशासनाच्या आदेशानुसार कंपनीला परत पाठविला आहे. (प्रतिनिधी)‘मॅगी’च्या सहा नमुन्यांपैकी दोन नमुन्यांत मोनोसोडियम, तर चार नमुन्यांत जस्त या धातूचे प्रमाण आढळले आहे. आतापर्यंत कोल्हापुरातून ३२ लाखांचा साठा जप्त केला आहे, तर २६ लाखांची ‘मॅगी’ कंपनीला परत पाठविण्यास व्यापाऱ्यांना भाग पाडले आहे. तसेच ‘मॅगी’च्या १६ ब्रँडची तपासणी सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनी ‘मॅगी’ ज्या दुकानदारांकडून घेतली असेल, त्या दुकानदारास परत करा, असे आवाहन केले आहे.- संपत देशमुख, सहायक आयुक्त, अन्न औषध प्रशासन
‘मॅगी’चा २६ लाखांचा साठा परत
By admin | Published: June 11, 2015 1:03 AM