अवकाश निरिक्षकांची उंचावरील प्रदूषणमुक्त पन्हाळगडाची पसंती
संदीप आडनाईक, ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. १० - येत्या माघ पौर्णिमेला म्हणजे नव्याच्या पौर्णिमेला शुक्रवारी (१0 फेब्रुवारी) पन्हाळ्यावरील पुसाटी पॉर्इंट आणि मसाई पठारावरुन सायंकाळी दिसणाºया क्षितीजरेषेवर एकाचवेळी सूर्यास्त व चंद्रोदय पाहण्याची दुर्मीळ संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.
फेब्रुवारीपर्यंत अवकाश निरभ्र असते, त्यामुळे जिथे प्रदूषण कमी आहे, अशा ठिकाणाहून अवकाश निरीक्षण करणाºया खगोलप्रेमींना ही अपूर्व संधी असते, कारण केवळ डोळ्यांनी अवकाशातील तारे आणि ग्रहांचे दर्शन होत असते. येत्या माघ पौर्णिमेला सूर्यास्त आणि चंद्रोदय एकाच क्षितिजरेषेवर पाहता येणार आहे. यासाठी कोणत्याही सूक्ष्मदर्शिकेची गरज भासणार नाही, असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे. या काळात अवकाशात शुक्र आणि मंगळ हे दोन ग्र्रहही साध्या डोळ्यांनी अतिशय स्वच्छ आणि स्पष्ट दिसतात.
पन्हाळा हे कोल्हापूरपेक्षा सातपटीने प्रदूषणमुक्त आहे. त्यामुळे या परिसरातून अवकाश निरीक्षण करणे ही एक पर्वणी असते. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागामार्फत पन्हाळ्यावर यासाठीच अवकाश संशोधन केंद्र उभारण्याचे काम सुरु आहे.
कन्याकुमारी येथून पूर्व व पश्चिम क्षितिज एकाचवेळी दिसतात. त्यामुळे याठिकाणीही सूर्यास्त आणि चंद्रोदय एकाचवेळी पाहण्याची संधी मिळते. तसेच कोल्हापुरातील मसाईचे पठार आणि पुसाटी पॉर्इंट ही दोन ठिकाणे उंचावर असल्यामुळे प्रदूषणाचा अडथळा नसतो. त्यामुळे येथे सूर्यास्त आणि चंद्रोदय अधिक तेजस्वी दिसतो. सूर्य मावळताना गडद लाल होताना दिसतो, याचे दर्शन घेणे हा एक अनुभव आहे. याचे छायाचित्रण करणे हाही एक अविस्मरणीय अनुभव असणार आहे.
अनेक वर्षे अवकाशदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करणारे केआयटी कॉलेजचे प्रा. विवेक देसाई, प्रा. विदुला स्वामी तसेच शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. फुलारी आणि पीएचडीचे विद्यार्थी अविराज जत्राटकर यांनी या अपूर्व संधीचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
कशी असेल सूर्यास्त-चंद्रोदयाची स्थिती
प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. चंद्र सूर्याच्या बरोबर विरुध्द बाजूला असतो. त्यामुळे जेव्हा सूर्य मावळतो, तेव्हा चंद्र उगवतो. मात्र, प्रत्येक वेळी सूर्यास्ताची आणि चंद्रोदयाची वेळ एकच नसते. याचे कारण म्हणजे चंद्राची पृथ्वीभोवतीची थोडी कललेली कक्षा. चंद्राची कक्षा ही सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाºया काल्पनिक रेषेच्या प्रतलास समांतर अशी नाही. मात्र, पृथ्वीभोवतीच्या एका फेरीत ही कक्षा दोन वेळा या काल्पनिक प्रतलास छेदते. त्या दोन्ही वेळेस ग्रहणे घडून येतात. येत्या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे. यादिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र अगदी सरळ रेषेत येतील आणि आपण आता पृथ्वीवर अशा ठिकाणी आहोत, की चंद्रोदयाची वेळ सूर्यास्ताच्या काही मिनिटे आपणास पश्चिम क्षितिजावर लालसर मोठे सूर्यबिंब आणि पूर्व क्षितिजावर तितकेच मोठे आणि लालसर चंद्रबिंब पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
अवकाश निरिक्षणाला प्रदूषणमुक्त पन्हाळ्याला पसंती
प्रदूषणमुक्त पन्हाळा हा अवकाश निरिक्षणासाठी अतिशय उत्तम असल्याने हे उंंचावरील ठिकाण अनेक आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधकांच्या पसंतीचे आहे. या परिसरातून म्हणजे पुसाटी पॉर्इंट, तीन दरवाजा, मसाईचे पठार येथून प्रदूषणमुक्त अवकाश अभ्यासकांबरोबरच पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे. या परिसरात म्हणूनच अवकाश संशोधन केंद्राची उभारणी शिवाजी विद्यापीठ करत आहे. सध्या पन्हाळ्यावर या केंद्राचे रिसिव्हर असून आंतरराष्ट्रीय दर्जाची शक्तिशाली दुर्बिणलवकरच बसविण्यात येणार आहे.
मित्रांसह आम्ही गतवर्षी २२ फेब्रुवारीला नव्याच्या पौर्णिमेला मसाई पठारावर जाउन एकाचवेळी सूर्यास्त आणि चंद्रोदय दर्शनाचा आनंद लुटला होता. याहीवर्षी हा सोहळा पाहण्याचे नियोजन आहे. अतिशय तेजस्वी सूर्य पाहतानाच चंद्राचे संपूर्ण दर्शन हा एक अनुभव आहे.
- वसंतराव घोरपडे, निवृत्त अधिकारी,दूरसंचार.