कोल्हापूर : अन्न व औषध प्रशासनाने २५ मे रोजी तपासणीसाठी घेतलेल्या ‘मॅगी’च्या चार नमुन्यांपैकी दोन नमुन्यांत शिशाचे प्रमाण जास्त आढळल्याने विक्रेता ते उत्पादक यांच्या टोकापर्यंत तपास करून दोषींविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे गुरुवारी येथे दिली. अन्नसुरक्षा व मानदे अधिनियम २००६ची प्रभावी अंमलबजावणी, नियंत्रण व समस्यांचे निराकरण, तसेच दूध भेसळीस आळा, या संदर्भातील समितीची बैठक झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी होते.गोकुळ शिरगाव येथील वितरकाकडून ३२ लाखांचा ‘मॅगी’चा साठा जप्त करून जे १६ नमुने तपासणीस घेतले आहेत, त्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच विश्लेषण अहवालातील निष्कर्षानुसार कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त एस. एन. देशमुख यांनी सांगितले. दोन दिवसांत संबंधित वितरकाने १३ लाख १३ हजार रुपयांचा ‘मॅगी’चा साठा बाजारपेठेतून परत मागवल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश डोके, पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव, महापालिकेचे अन्नसुरक्षा अधिकारी एस. ए. केदार, अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ २ चे सहायक आयुक्त (अन्न) सु. आ. चौगुले, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी एस. जी. खाडे आदी उपस्थित होते.सकस, निर्भेळ अन्नाबाबत दक्षता घ्या : सैनी सणासुदीच्या दिवसांत दूध, मिठाई, खवा, खाद्यतेल, वनस्पती, बेसन यांचे नमुने घेऊन ग्राहकांना स्वच्छ, सकस व निर्भेळ अन्न पुरविण्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने दक्षता घ्यावी. फिरत्या विक्रेत्यांकडून अन्नाबाबत स्वच्छतेचे निकष पाळले जात नसतील तर त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी दिले. तसेच नवीन परवाने, नोंदणी दाखले देणे व त्यांच्या नूतनीकरणाचे कामकाज सेतूमार्फत करण्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांनी दिले.
‘मॅगी’त शिशाचे प्रमाण अधिक
By admin | Published: June 12, 2015 1:02 AM