आजरा : मशिदीवरील भोंग्या विरोधात मनसेने आज आजऱ्यातील राम मंदिरात महाआरती करून शासनाचा निषेध केला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मशिदीवरील भोंगे तातडीने हटवावेत अशीही मागणी केली. दरम्यान पोलिसांनी आज सकाळीच मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना नोटीस लागू केल्या आहेत.आजरा शहरात सर्वधर्मीय गुण्यागोविंदाने रहात असले तरी पोलिस दप्तरी आजरा अतिसंवेदनशील शहर आहे. त्या अनुषंगाने कालपासून पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना हनुमान चालीसा व मशीदीवरील भोंगेबाबत नोटीस लागू केल्या आहेत. पोलिसांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यास विरोध केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राममंदिरात येऊन महाआरती केली.महाआरतीला मनसेचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजरा शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था हा प्रश्न आणि शांतता राखण्यासाठी मनसेचे सुधीर सुपल, अनिल नेऊंगरे,आनंदा घंटे, पुनम भादवणकर, चंद्रकांत सांबरेकर यांना नोटीस दिली आहे.
मशिदीवरील भोंग्या विरोधात आजऱ्यात राममंदिरात महाआरती, मनसेच्या पाच पदाधिकाऱ्यांना नोटीस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 5:10 PM