कोल्हापूर : महापूर ओसरल्यामुळे शहरातील पूरग्रस्त भागातील महास्वच्छता मोहीम महापालिका प्रशासन आज (मंगळवार)पासून हाती घेणार आहे. ही महास्वच्छता मोहीम ३१ जुलैअखेर चालणार असून, प्रत्येक दिवशी कोणत्या प्रभागात, कशाप्रकारे चालणार याचे सूक्ष्मनियोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन हजार कर्मचारी त्यात सहभागी होत आहेत.
महापालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी सोमवारी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याचे नियोजन केले. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु राहणार आहे.
या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना बलकवडे यांनी सांगितले की, पालिकेचे सुमारे दोन हजार कर्मचारी, अधिकारी पाच दिवस अखंडपणे ही मोहीम राबवतील. त्यांना आवश्यक खरमाती, चिखल, पुराच्या पाण्यात खराब झालेले साहित्य उचलण्यासाठी डंपर्स, पोकलेन, ड्रेनेज सफाईसाठी चार जेट मशिन्स, सक्शन मशीन, औषध फवारणीसाठी चार ट्रॅक्टरसह १०० हॅण्डपंप उपलब्ध करुन दिले आहेत.
शहरातील २८ प्रभागांमध्ये पुराचे सर्वाधिक पाणी आले होते, तेथे प्राधान्याने साफसफाई केली जाणार आहे. ड्रेनेज लाईन साफ केल्या जाणार आहेत. कोणत्या प्रभागात कोणत्या दिवशी साफसफाई होणार, तेथे किती कर्मचारी असतील, त्यांनी केलेल्या कामाचा अहवाल कसा द्यावा, याचे नियोजन झाले आहे. मंगळवारी ही मोहीम सुरु होईल.
मुंबई महानगरपालिका प्रशासनाने काही यंत्रणा उपलब्ध करुन दिली असून, त्यांच्याकडे आरोग्य कर्मचाऱ्यांची मागणी केली आहे. पूरग्रस्तांना वैद्यकीय सुविधा देण्यासाठी त्यांची काही पथकेही येणार आहेत. काही स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाई, केडीएम, महाविद्यालये या महास्वच्छता मोहिमेत सहभागी होतील, असेही बलकवडे यांनी सांगितले.