कोल्हापूर : महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकास दारूविक्रीचा परवाना मिळवून देण्याचे आमिष दाखवून चौघांनी एक कोटी पाच लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा वाई पोलिस ठाण्यात दाखल आहे. याप्रकरणी पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) अपर पोलिस अधीक्षक श्रीकांत नामदेवराव कोल्हापुरे (सद्या रा. पुणे, मूळ रा. कोल्हापूर) याला अटक झाली. कोल्हापूर सीआयडीच्या अधीक्षक मनीषा दुबुले यांच्या पथकाने नाशिक-मुंबई मार्गावर खटवळ टोलनाका येथे अटकेची कारवाई केली.पोलिस अधीक्षक मनीषा दुबुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे येथील अपर पोलिस अधीक्षक कोल्हापुरे आणि त्यांच्या साथीदारांनी हॉटेल व्यावसायिकाकडून एक कोटी पाच लाख रुपये रोख आणि धनादेशाद्वारे घेतले. मात्र, दारू विक्रीचा परवाना मिळवून दिला नाही. याबाबत हॉटेल व्यावसायिकाने पोलिस महासंचालकांकडे तक्रार केली होती. तपास अधिकारी अधीक्षक दुबुले यांनी या गुन्ह्यातील संशयित हनुमंत विष्णूदास मुंढे, अभिमन्यू रामदास देडग आणि बाळू बाबासाहेब पुजारी या तिघांना अटक केली होती.पाच दिवसांची पोलिस कोठडी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार श्रीकांत कोल्हापुरे हा पसार होता. दुबुले यांच्या पथकाने कोल्हापुरे याला अटक करून वाई न्यायालयात हजर केले. त्याची पाच दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी झाली. दुबुले यांच्यासह उपअधीक्षक गणेश माळी, निरीक्षक वर्षा कावडे, अंमलदार विजय कुंभार, निवृत्ती पाडेकर, जमीर मुल्ला आणि स्वप्नील जाधव यांच्या पथकाने कारवाई केली.
सीआयडीचे अपर पोलिस अधीक्षक अटकेत, दारु विक्रीच्या परवान्यासाठी महाबळेश्वरच्या व्यावसायिकाची कोटीची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2024 3:29 PM