लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे स्वस्त झाले आहे. गतवर्षीपेक्षा भात, सोयाबीनसह कडधान्य बियाण्यांचे दर सरासरी १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत. जिल्ह्यासाठी मंजूर ४७४७ क्विंटल बियाण्यांपैकी २५०० क्विंटल विक्रेत्यांकडे पाठविले आहे. खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने शेतकऱ्यांना बियाण्यांची उपलब्धता केली आहे. जिल्ह्यात भात, सोयाबीन, मूग, तूर, उडीद, भुईमूग ही प्रामुख्याने पिके घेतली जातात. सर्वाधिक भाताचे त्यानंतर सोयाबीन व भुईमूग पीक घेतले जाते. सोयाबीनचे २६२२ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असून, त्यातील १२५० क्विंटलचे वाटप झाले आहे. ‘इंद्रायणी’ ५७० क्विंटल, ‘जया’ ७३२ क्विंटलसह इतर वाणांचे भातबियाणे २१२५ क्विंटल आवक झाली आहे. गेल्यावर्षी पाऊस चांगला झाल्याने सर्वच खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. परिणामी, शेतकऱ्यांकडून बियाण्यांचे उत्पादनही चांगले झाले. त्यामुळे यंदा बियाणे मुबलक असून दरातही कपात केली आहे. सरासरी प्रत्येक वाणामागे १५ टक्क्यांनी दर कमी केले आहेत. ‘सोयाबीन-जेएस ३३५’ या वाणाचा दर ५७ रुपये किलो, ‘इंद्रायणी’ प्रतिकिलो ५०, ‘जया’ ३३, ‘भोगावती’, ‘सुवर्णा’ ४५,‘एचएमटी’ ३५, ‘रत्नागिरी-२४’चे वाण ४३ रुपये दर आहे. या दराने शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध होणार आहे. याशिवाय कडधान्यही यंदा वेळेवर उपलब्ध झाले असून मूग १८० रुपये, उडीद १६९ तर तूर १४० रुपये प्रतिकिलोप्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. रोहिण्याचा पेरा साधणार?जिल्ह्यात भाताची धूळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. रोहिणी नक्षत्रातील पेऱ्याची चांगली उगवण होते. २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करत आहे. त्यात यंदा वळवाने जोरदार हजेरी लावल्याने रोहिणीचा पेरा साधण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. जिल्ह्याचे खरिपाचे क्षेत्र पाहता यंदा बियाण्यांची उपलब्धता झाली आहे. ‘महाबीज’कडून उपलब्ध बियाण्यांपैकी ५० टक्क्यांहून अधिक विक्रेत्यांकडे दिले असून २० मे पर्यंत उर्वरित बियाणेही देणार आहे. - सी. बी. शिंदे (उपव्यवस्थापक, महाबीज) चोवीस विक्रेत्यांकडून बियाणे मिळणारजिल्ह्यात महाबीजचे २४ बियाणे विक्रेते आहेत. यापैकी ९ सहकारी संघ, तर १५ खासगी विक्रेते आहेत. त्यांच्याकडे बियाणे उपलब्ध करून दिले असून, भुईमुगाचे बियाणे येत्या पंधरा दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
‘महाबीज’चे बियाणे झाले स्वस्त
By admin | Published: May 09, 2017 12:44 AM