मुंबई/कोल्हापूर/सांगली : कर्नाटकातील आलमट्टी धरणातून सुरू झालेला विसर्ग आणि पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांना आलेला पूर ओसरू लागला असून, मदतकार्य युद्धपातळीवर सुरू असल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे.सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे, तसेच पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब १० किलो गहू, १० किलो तांदूळ व ५ लीटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. पूरस्थिती उद्भवल्यानंतर पाचव्या दिवशी सरकारी यंत्रणा जोमाने मदत कार्यास लागली. स्वत: महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पूरस्थळी भेटी देऊन सरकारी यंत्रणा गतिमान केली. दहा हजारांची मदतसातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरस्थितीमुळे शाळा अथवा अन्य सुरक्षितस्थळी हलवण्यात आलेल्या प्रत्येक कुटुंबास तातडीने दहा हजारांची मदत केली जाणार आहे. त्याबाबतचा निर्णय घेत शासनाने १५४ कोटींचा निधीही वर्ग केला असून, पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर तो जमा होणार आहे, अशी माहिती मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
सांगली, कोल्हापुरात मदतीची महाभरती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 4:03 AM