विश्वास पाटील/ कोल्हापूर लाच घेताना पकडलेल्या कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापौर तृप्ती माळवी यांचा राजीनामा न होण्यामागे खासदार धनंजय महाडिक विरुद्ध माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्यातील कुरघोडीचे राजकारण कारणीभूत आहे. माळवी यांच्यानंतर सतेज पाटील गटाच्या सदस्यास महापौरपदाची संधी मिळणार असल्याने ती मिळू नये यासाठीच हा सगळा खटाटोप सुरू आहे; परंतु त्यामुळे महापौरपदाची जास्तच बदनामी होत आहे. महापौरांनाच थेट लाच घेताना पकडल्याने अगोदरच त्या पदाची व शहराचीही बेअब्रू झाली. परंतु, आता पुन्हा त्या राजीनामा देण्याचे टाळून काय साध्य करीत आहेत हेच समजत नाही. महापौर माळवी यांचा राजीनामा लांबणीवर पडण्यामागेही राष्ट्रवादीतील वर्चस्वाचे राजकारण कारणीभूत आहे. सतेज पाटील यांनी जिल्हा परिषदेत तत्कालीन अध्यक्ष संजय मंडलिक यांचा राजीनामा असाच लांबवला होता. कारण त्यांना त्यावेळी अमल महाडिक यांना अध्यक्ष होऊ द्यायचे नव्हते. आता बरोबर त्याच्या उलट घडामोडी होत आहेत. मुश्रीफ व सतेज पाटील यांच्यातील पक्षातीत मैत्रीही राजीनामा लांबविण्यामागे कारणीभूत आहे. माळवी यांना स्वीय साहाय्यकांमार्फत लाच घेताना पकडल्यानंतर पक्षाने त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय त्याचदिवशी घेतला. त्यास महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे भ्रष्टाचार अशी चर्चा सर्व स्तरांत आहे. त्याचा फटका पक्षाला विधानसभा निवडणुकीतही बसला. आता नोव्हेंबर २०१५ मध्ये महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढणार हे स्पष्टच दिसत आहे. शिवसेना-भाजप लाच प्रकरणाचे भांडवल करीत असल्याने त्यात पक्षाची अब्रू जाऊ नये म्हणून राजीनामा घेऊन या बदनामीतून सुटका करून घेण्याचा पक्षाचा प्रयत्न होता. पक्षाचे नेते अजित पवार यांनीही म्हणून पक्ष कुणाची गय करणार, नाही असे जाहीरपणे सांगितले. पक्षाच्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी लाच प्रकरणाचे समर्थन करणार नाही, असे सांगत माळवी यांना अप्रत्यक्षपणे पाठबळही दिले. त्यांना विरोध करून माळवी यांनी राजीनामाच दिला नाही तर राष्ट्रवादी त्यांचे कांहीच वाकडे करू शकत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबतच आहोत, तेवढा गुपचूप राजीनामा द्या, असे दडपण आणण्यासाठीच त्यांनी हे वक्तव्य जाणीवपूर्वक केले. परंतु, तरीही माळवी यांनी राजीनामा न देता मुश्रीफ यांचा आदेश धुडकावला. तसे धाडस त्या करू शकल्या कारण त्यांना राष्ट्रवादीतलाच एक गट पाठिंबा देत आहे. सद्य:स्थितीत सुनील कदम, सुहास लटोरे व अन्य कांही असंतुष्टांचे माळवींना पाठबळ आहे. ही महाडिक गटाची म्हणून ओळखली जाणारी माणसे आहेत. त्यामुळे त्यांच्याशी माझा कांही संबंध नाही असे खासदार महाडिक म्हणूच शकत नाहीत. कारण त्यांना ज्या पक्षाने खासदार केले, त्याच पक्षाचे नेते महापौरांना राजीनामा देण्यास सांगूनही त्या देत नसतील तर हा पक्षाचा व त्या नेत्याचाही हा अवमान आहे व त्याचे सोयरसुतक खासदारांना काहीच नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाडिक यांचा पाठिंबा नसता तर माळवी यांना राजीनामा पुढे ढकलण्याची हिंमतच झाली नसती. ज्या मुश्रीफ यांच्या शब्दावर माळवी महापौर झाल्या त्याच मुश्रीफ यांनी पाचवेळा फोन करूनही राजीनामा दिला नाही हे धाडस त्यांना आले कोठून हे शोधले की, पक्षातील कुरघोडीचे राजकारण लक्षात येते. महापालिका निवडणुकीतही मुश्रीफ यांचा आग्रह राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याचा असेल तर खासदार महाडिक यांचा ताराराणी आघाडीचा सवतासुभा असेल. त्या सुभ्याच्या पहिल्या उमेदवार म्हणून महाडिक गट माळवी यांच्यामागे उभा राहिला आहे.
राजीनामा रोखण्यात महाडिक गटाची कुरघोडी
By admin | Published: February 15, 2015 12:48 AM