कोल्हापूर : कसबा बावड्यात राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार महादेवराव महाडिक गटाला मोठा हादरा बसण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी नाकारल्याने नाराज माजी नगरसेविका माणिक पाटील व जयवंत पाटील गटाने सतेज पाटील यांच्या चमूत सामील होण्याची तयारी पूर्ण केली. त्याचे पडसाद ‘राजाराम’ व बावड्यात महापालिकेच्या निवडणुकीसह श्रीराम सोसायटीच्या निवडणुकीवर होणार आहे. सतेज पाटील यांच्याशी तात्त्विक मतभेद झाल्याने पाच वर्षांपूर्वी पाटील गटाने फारकत घेत बावड्यात सवतासुभा मांडला. पाटील गटाने सतेज पाटील यांच्या विरोधात महापालिका निवडणुकीत थेट आव्हान उभे केले. त्यातूनच प्रभाग क्रमांक-३ मधून माणिक पाटील याचा निसटता पराभव झाला. संघर्षास महाडिक यांचे पाठबळ मिळाले. २००९ च्या ‘दक्षिण’च्या निवडणुकीत पाटील दाम्पत्य प्रचारात आघाडीवर राहिले. हा संघर्ष तेवत ठेवण्यासाठी माणिक पाटील यांना ‘राजाराम’वर ‘स्वीकृत संचालक’ म्हणून घेतले होते.पण निवडणुकीत जयवंत पाटील यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी महाडिक यांनी निरोप दिला. त्यामुळे माणिक पाटील व गटाच्या कार्यकर्त्यांची भावाना दुखावल्या. दरम्यान, सतेज पाटील व जयवंत पाटील यांनी मागील सर्व विसरून एकत्र येण्यासाठी चर्चा केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर महाडिक गटाने मनधरणीचा प्रयत्न सुरू केला आहे. पाटील गट तटस्थ राहिला तरी फटका महाडिक यांना येत्या स्थानिक निवडणुकीत बावडा परिसरात बसणार आहे (प्रतिनिधी)भाकरी परतलीच नाही...‘पुतण्या खासदार झाला, मुलगा आमदार झाला. मात्र, बावड्यातील ‘राजाराम’च्या संचालकांनी साधी ‘चिमणी’ फटाकेही उडविण्याची किंवा लहान पोस्टर लावण्याचेही धाडस केले नाही’. ही सल महाडिक यांनी बावड्यातील अनेक इच्छुकांना बोलूनही दाखविली. त्यामुळे बावड्यात महाडिक ‘भाकरी’ परतणार, अशीच अटकळ होती तसे न घडता, महाडिकांनी पुन्हा जुन्या शिलेदारांनाच मैदानात उतरविले. यातच माणिक पाटील गट सतेज पाटील यांच्या गळाला लागल्यास बावड्यातून महाडिक गट हद्दपार झाल्यासारखेच होणार आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याचे माजी नगरसेविका माणिक पाटील व जयवंत पाटील यांनी स्पष्ट केले.
महाडिक गटाला खिंडार
By admin | Published: April 16, 2015 12:28 AM