जयसिंगपूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह माजी आमदार उल्हास पाटील, दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांची भेट घेतली. राजू शेट्टी यांच्यासोबत निवडणुकीवर सुमारे तासभर चर्चा झाली. दरम्यान, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील भूमिका ठरवू, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. दोन्ही आघाडीकडून जोडण्या लावण्यास वेग आला आहे. बुधवारी सकाळी महादेवराव महाडिक यांनी राजू शेट्टी यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी गोकुळबरोबरच येणाऱ्या अन्य निवडणुकांबाबत उहापोह झाला. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांनीदेखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शेट्टी-महाडिक त्यांच्या भेटीलाही तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. येत्या दोन दिवसांत कार्यकर्त्यांशी चर्चा करून आपली भूमिका जाहीर करू, असे आश्वासन शेट्टी यांनी महाडिक यांना दिल्याचे समजते. यावेळी नगरसेवक शीतल गतारे, पं. स. सदस्य सचिन शिंदे उपस्थित होते. दरम्यान, महाडिक यांनी माजी आमदार उल्हास पाटील, सावकार मादनाईक, गणपतराव पाटील यांची देखील भेट घेऊन चर्चा केली. महाडिक यांच्या दौऱ्यामुळे शिरोळ तालुक्यातील गोकुळचे राजकारण चांगलेच तापले आहे.
फोटो - ३१०३२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - गोकुळ दूध संघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी बुधवारी राजू शेट्टी यांची निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली.