लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दहा वर्षांपूर्वी पालकमंत्री हे ज्येेष्ठ नेते महादेवराव महाडिक यांच्यासोबत काम करत होते. आता थोडासा गॅप पडल्याने महाडिक यांच्या नित्यनियमांचा विसर पडला असेल. महाडिक यांची दुपारची झोप गेली असली तरी हरकत नाही. मात्र, पालकमंत्र्यांची रात्रीची झोप होण्याअगोदर ते जिल्हा पिंजून काढतात, हे ध्यानात ठेवावे, असा पलटवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक यांनी केला.
‘गोकुळ’साठी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शौमिका महाडिक आल्या असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शौमिका महाडिक म्हणाल्या, निवडणूक आली की कोणीही झोपत नाही, सत्ताधारी काय आणि विरोधक सगळ्यांनाच पायाला भिंगरी बांधून पळावे लागते. जिल्हा पिंजून काढावा लागतो. त्याप्रमाणे महादेवराव महाडिक काम करतात, त्यामध्ये एवढे विशेष काहीच नाही. दहा वर्षांपूर्वीचे महादेवराव महाडिक आणि आताचे यात फरक आहे. पालकमंत्री दहा वर्षांपूर्वी त्यांना ओळखत होते. आता दहा वर्षांचा गॅप पडल्याने कदाचित त्यांच्या नित्यनियमाचा विसर पडल्याचा टोलाही शौमिका महाडिक यांनी लगावला.
विरोधकांनी मोट बांधली म्हणूनच रिंगणात
महादेवराव महाडिक, अरूण नरके व आमदार पी. एन. पाटील (मनपा) यांच्या नेतृत्वाखाली चाळीस वर्षे ‘गोकुळ’ची वाटचाल खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे. दिवसेंदिवस प्रगती वाढतच असून, हे कोणीही नाकारू शकत नाही. चाळीस वर्षांत ‘मनपा’च्या कुटुंबातील कोणीही सदस्य नव्हते, मात्र विरोधकांनी ‘गोकुळ’वर कब्जा करण्यासाठी मोट बांधल्याने त्यांना टक्कर द्यायची असेल तर तीन नेत्यांच्या कुटुंबातील सदस्य सत्तेत असावेत, अशी मागणी ठरावधारक विशेष म्हणजे महिलांमधून झाल्यानेच आपण अर्ज दाखल केल्याचे शौमिका महाडिक यांनी सांगितले.