कोल्हापूर : गोकुळच्या टँकरमधून वर्षाला मिळणाऱ्या १३४ कोटी वाचवण्यासाठीच महादेवराव महाडीक संघाच्या निवडणूकीत ३:१३:२३ तारखेचे तुणतुणे वाजवत होते. त्यांचा गोकुळमधील स्वार्थ लोकांसमोर आला असून अनेक वर्षे व्यंकटेश्वरा गुडस मुव्हर्स व कोल्हापूर आईस कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून लुटण्याचे काम केल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. गोकुळचा आढावा घेतल्यानंतर डोळे चक्रावले असून संघाच्या पुर्वीच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचे किंम जोंग उन यांच्यासारखा होता, अशी खरमरीत टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.गोकुळ शिरगाव येथील प्रकल्पावर सोमवारी गोकुळच्या वीस लाख लिटर अमृतकलश पूजन मंत्री मुश्रीफ व मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांना अभिवादन करुन अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री मुश्रीफ म्हणाले, मागील संचालक मंडळाने एनडीडीबीचे कर्ज काढून २० लाख लिटरपर्यंत क्षमता वाढवली आणि नोकरभरती केली. हे सगळे पाहून डोळे चक्रावून गेले असून स्वर्गीय आनंदराव पाटील-चुयेकर यांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन २० लाख लिटर दूध संकलनाच शिवधनुष्य उचलले आहे.
दीड वर्षापुर्वी जाता जाता २७५ कर्मचाऱ्यांची भरती केली, कायदा पायदळी तुडवून दोन महिन्याच्या प्रशिक्षणार्थी कालावधीतनंतर त्यांना कायम केले. सामाजिक जीवनात कार्यरत असताना असे उघड्यावर आपण काय करतो, खरेतर याची लाज कशी वाटत नाही. मागील संचालक मंडळ व त्यांच्या नेत्यांचा कारभार हा उत्तर कोरियाचे किंम जोंग उन पेक्षा कमी नव्हता.मंत्री पाटील म्हणाले, उत्पादकांना दोन रुपये जादा दर देणे हा आमचा अजेंडा आहे. संघाचा आर्थिक तोटा कमी करण्यासाठी टँकरचे दर कमी करणार आहे. पशुखाद्य कच्चा माल खरेदीत पारदर्शकता, त्याचे वितरण तालुकास्तरावर कसे होईल, वर्षाला तीन लाख लिटर दूध संकलन वाढ, याचे नियोजन केले आहे. राष्ट्रीय कृषी योजनेचे संघाचे ५० कोटी प्रलंबीत असून तेही लवकर देण्याचा प्रयत्न करु.