लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून, कोल्हापुरात आले आणि एक-एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वत:साठी केला. मात्र, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहिती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, स्वत:चे टँकर वाचविण्यासाठी यांची धडपड असून, दोन नंबरवाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सतेज पाटील म्हणाले, सभासदांच्या पाठिंब्यामुळेच आमचा आत्मविश्वास वाढला असून, राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार, हे निश्चित आहे. आमच्यावर टीका करणारे धनंजय महाडिक यांच्यासारखा खोटे बोलणारा माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात २०१७ला आपला एकही टँकर नसल्याचे जाहीर केले आणि त्यांचे चुलते आमचे ४० टँकर आहेत, म्हणून सांगतात. लोकसभेला जनतेने त्यांचा खरा चेहरा ओळखला, आताही तेच करतील. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांच्याबद्दल विचारले असता, अशोक चराटी यांच्याशी चर्चा झाली होती, स्थानिक राजकीय दबावापोटीच त्यांनी भूमिका बदलली असली तरी ते आमच्यासोबतच राहतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘गोकुळ’मध्ये विरोधी आघाडीच्या विजयाची औपचारिकता राहिली आहे. सत्ता आमची येणारच आहे. ‘गोकुळ’च्या कारभाराबाबत अनेक वर्षे आरोप ऐकत आहे, आता उबग आली असून, सभासदांनी मताव्दारे या मंडळींना हुसकावून लावण्याची वेळ आली आहे. ‘गोकुळ’मध्ये चुकीचे चालले आहे, ते थांबविण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. राजकीय अड्डा करण्याचा प्रश्नच नाही, आम्ही दोघेही मंत्री आहोत, त्यामुळे ‘गोकुळ’मध्ये आमचा जीव असायचे कारणच नाही.
मग ‘राजाराम’मध्ये दमछाक का झाली
राजाराम कारखान्याला हजार सभासद वाढवले हाेते, पॅनल शंभर-दीडशे मतांनी आले, तिथे दमछाक का झाली, त्यामुळे असे काही नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. वाढीव मतांचे विश्लेषण करताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, सत्ताधारी मंडळी वाढीव चारशे मतांवर विजयाचे गणित मांडत आहेत, मग सत्तारूढ चार संचालक आणि राष्ट्रवादी अशी एक हजार मते आता विरोधात गेली आहेत, त्यामुळे त्यांच्या हिशोबाप्रमाणे सहाशे मतांने विरोधी आघाडीच्या विजयाची घोषणाच त्यांनी केली.
शेट्टींची भूमिका अनाकलनीय
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या भूमिकेवर आपण काही बोलणार नाही. मात्र, त्यांची भूमिका अनाकलनीय असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
मोठ्या नेत्याचा पाठिंब्यावर मुश्रीफ यांचे स्मितहास्य
लवकरच जिल्ह्यातील मोठ्या नेत्याचा पाठिंबा आपणास मिळणार असल्याचे पी. एन. पाटील यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता, मंत्री मुश्रीफ यांनी उद्या तर ३० एप्रिल, परवा मतदान मग काय बोलायचे, असे म्हणत स्मितहास्य केले.
त्याचदिवशी एक रूपया जादा दर
‘गोकुळ’मधील टँकरचे टेंडर ज्यादिवशी नवीन काढले जातील, त्याचदिवशी लीटरला एक रूपये जादा दर देऊ शकतो. त्यामुळे एकवेळ आम्हाला संधी द्या, दोन रूपये जादा दिल्याशिवाय राहणार नाही, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.