कोल्हापूर : महाडिकांचा कारभार म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीसारखा असून कोल्हापूरात आले आणि एक एक संस्था ताब्यात घेतल्या आणि त्याचा वापर स्वतासाठी केला. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला माहीती आहे, आपलं कोण आणि परके कोण आहे? अशी टीका पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. दूध उत्पादकांच्या हितासाठी आम्ही एकत्र आलो, स्वताचे टँकर वाचवण्यासाठी यांची धडपड असून दोन नंबर वाल्यांनी आमच्या आघाडीबद्दल बोलू नये, असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला.सतेज पाटील म्हणाले, सभासदांच्या पाठींब्यामुळेच आमचा आत्मविश्वास वाढला असून राजर्षि शाहू शेतकरी आघाडीचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होणार हे निश्चित आहे. आमच्यावर टीका करणारे धनंजय महाडीक यांचा सारखा खोटे बोलणार माणूस राजकारणात शोधून सापडणार नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात २०१७ ला आपला एकही टँकर नसल्याचे जाहीर केले, आणि त्यांचे चुलते आमचे ४० टँकर आहेत, म्हणून सांगतात.
लोकसभेला जननेते त्यांचा खरा चेहरा ओळखला, आताही तेच करतील. जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांच्याबद्दल विचारले असता, अशोक चराटी यांच्याशी चर्चा झाली होती, स्थानिक राजकीय दबावापोटीच त्यांनी भूमिका बदलली असली तरी ते आमच्यासोबतच राहतील, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळमध्ये विरोधी आघाडीच्या विजयाची औपचारिकता राहिली आहे. सत्ता आमची येणारच आहे. गोकुळच्या कारभाराबाबत अनेक वर्षे आरोप ऐकत आहे, आता उबग आली असून सभासदांनी मताव्दारे या मंडळींना हुसकावून लावण्याची वेळ आली आहे. गोकुळमध्ये चुकीचे चालले आहे, ते थांबवण्यासाठी आम्हाला सत्ता हवी आहे. राजकीय अड्डा करण्याचा प्रश्नच नाही, आम्ही दोघेही मंत्री आहे, त्यामुळे गोकुळमध्ये आमचा जीव असायचे कारणच नाही.