कोल्हापूर : महापालिकेच्या निकालाचा गुलाल अजून हवेतच आहे तोपर्यंत विधान परिषदेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. दोन्ही काँग्रेसने महापालिकेची सत्ता काबीज केल्यामुळे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे आमदार महादेवराव महाडिक यांना आव्हान देणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे तसे संदेशही सोशल मीडियावर दुपारनंतर फिरू लागले. ‘आता लक्ष्य विधानपरिषद’ असेही थेट आव्हान त्यामध्ये दिले गेले होते. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांची गट्टी जमल्यास महाडिक गटाची ती विधान परिषद व लोकसभेलाही ती डोकेदुखी ठरू शकते. काँग्रेसचे आमदार महादेवराव महाडिक हे या निवडणूक अलिप्त असले तरी त्यांचा ताराराणी आघाडीला बळ दिल्याचे उघड गुपित आहे. त्यांच्यावर जिल्हा काँग्रेसकडून अहवाल आल्यानंतर पक्ष कारवाई करेल, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे; परंतु जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार महाडिक हे ‘गोकुळ’च्या राजकारणात एकत्र असल्याने जिल्हाध्यक्ष महाडिक यांच्या विरोधात अहवाल देण्याची शक्यता फारच धूसर आहे. जिल्हा काँग्रेस काय अहवाल देणार नाही आणि पक्ष काय त्यांच्यावर कारवाई करणार नाही अशीच काहीशी स्थिती आहे. त्यात आमदार महाडिक यांचीही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याशी जास्त सलगी आहे. त्यामुळे महाडिक यांच्यावर काय कारवाई होते याबद्दल उत्सुकता आहे.या निकालाने महाडिक व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दरी निर्माण केली. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात महाडिक यांच्यावर बोचरी टीका केली. मुश्रीफांनी टीकेचा बार उडवून दिल्यानंतर मग शिवसेनेचेही ‘महाडिक लक्ष्य’ बनले. (प्रतिनिधी)विधानपरिषद निवडणुकीत महाडिक यांच्या विजयाचा पाया कोल्हापूर महापालिकेतील मताधिक्य असतो. महापालिकेतील पन्नास मतांचा गठ्ठा घेऊनच ते मैदानात उतरतात.आता मात्र दोन्ही काँग्रेसला तेवढ्याच जागा मिळाल्याने त्यांची लढत तितकी सोपी नाही. त्याशिवाय जिल्हा परिषदेसह नगरपालिकांमध्ये दोन्ही काँग्रेसच्या चिन्हांवर निवडून आलेल्या मतदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे मुश्रीफ व सतेज पाटील यांनी मनांवर घेतले तर महाडिक यांना ही लढत सोपी जाणार नाही हेच महापालिकेच्या निकालाचेही फलित आहे.
महाडिक यांची वाट बिकट
By admin | Published: November 03, 2015 1:17 AM