वीरांच्या इतिहासावर आधारित अनेक लेखकांची नाटके आणि त्या नाटकांचे वेगवेगळ््या स्वरूपांतील आविष्कार, गेली दोन-तीनशे वर्षे मराठी भाषिक प्रेक्षकाला पाहावयास मिळाली आहेत. छत्रपती शिवाजी राजांचे सावत्रभाऊ व्यंकोजीराजेंचे चिरंजीव शाहराजे हे तर मराठी रंगभूमीचे जनक आणि आद्य मराठी नाटककार आहेत. तंजावर येथे शाहराजे भोसलेंनी रोवलेली मराठी नाटकांची मुहूर्तमेढ पुढे विष्णुदास भावेंच्या उपयोगी आली; तथापि शाहराजे भोसलेंना अनुल्लेखापासून मराठी रंगभूमीचे त्यांचे जनकत्व मराठी माणसाने सतत नाकारून मराठी माणसाची भलावण केली आहे; हे निर्विवाद!‘महामृत्युंजय’ हे नाटक परिवर्तन संस्थेने राज्य नाट्य स्पर्धेत सादर करून संभाजीराजेंचे चरित्र निवेदनांच्या साखळीतून मांडले. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजीराजेंच्यानंतर औरंगजेबाशी झुंज देऊन त्याला नामोहरम करणारा मराठा राजा आयुष्यभर त्याच्या स्वकियांनी, मंत्रीगणांनी, वतनदारांनी आणि नोकरशाहीने केलेल्या कारस्थानांचा बळी ठरला. हिंदवी साम्राज्यासाठी स्वत:चे बलिदान करून अजरामर झाला. आजही त्या राजाच्या नावाचे तेजोवलय चिरंजीव आहे नि स्फूर्तिस्थान आहे. संपूर्ण चरित्र स्पर्धेच्या नियमांप्रमाणे वेळेचे बंधन पाळत नाटकातून मांडणं हे तसे आव्हानच आहे. त्यामुळे ह्या मराठा राजाला त्यांच्या स्वकियांनीच वेळोवेळी कोंडी करून अडचणीत आणले. त्यावर सविस्तर प्रकाशझोत टाकता आला नसावा. मोगलांच्याप्रमाणे मराठा वतनदारराजे आणि नोकरशाहीचे ग्रहण संभाजीराजेंच्या कर्तृत्वाला कसे लागले होते, ह्याचे प्रसंग आणखी सविस्तरपणे असते तर ते मोठे उद्बोधक ठरले असते.मुळात संभाजीराजेंचा इतिहास विविध प्रसंगांनी ठसाठस भरलेला असल्यामुळे लेखकाला आवश्यक वाटलेल्या प्रसंगांव्यतिरिक्त अन्य प्रसंगांना लेखनमर्यादा आल्या असाव्यात. ऐतिहासिक व्यक्ती आणि प्रसंगांवर ललितकृती आधारलेली असेल तर तिच्या खरेपणाबद्दल आजवर बरीच चर्चा झाली आहे. सेतू माधवराव पगडींनी शिवाजी विद्यापीठातील शिवचरित्र व्याख्यानमालेत तर ऐतिहासिक नाटक, कादंबरीवाल्यांना हात जोडून विनंती करून खरा इतिहास वाचक, प्रेक्षकांच्यापुढे मांडावयास सांगितले होते. प्रस्तुत नाटकाच्या खरेपणाची हमी लेखकाने दिलीच आहे. एखाद्या संदर्भाबद्दल दखल घ्यावी, अशी शंका असलेच तर इतिहास संशोधक पाहून घेतील. सध्या तरी ‘जाणता राजा’ किंवा डॉ. अमोल कोल्हे यांच्या भव्य आणि छबिना, शिकारखान्यासह केलेल्या महानाट्यातील अवास्तव अवडंबराला फाटा देऊन संभाजीराजेंच्या जीवनावरचे दोन-अडीच तासांचे निवेदनशैलीतले लघुरूपातील नाटक पाहावयास मिळाले. सध्याच्या काळातली उपलब्ध नेपथ्य रचना, संगीत, नृत्य, प्रकाश योजना आणि वेशभूषा आपण त्या काळातील नाटक आजच्या संदर्भात पाहतो आहोत, याची आठवण करून देणारे वाटावे. प्रेक्षकांच्या कल्पनाशक्तीचा या नाटकास छान उपयोग होतो. त्यामुळे व्यावसायिक यशाची हमी असणाऱ्या आजच्या या प्रयोगात दिग्दर्शकाने सहजीप्राप्त करून घेतली आहे. या महानाट्याच्या लघुरूपात कलाकार, तंत्रज्ञांनी अवास्तव गोंधळ न घालता दिग्दर्शकाला चांगली साथ दिली आहे. त्यामुळे त्रिवार अभिनंदन! संभाजीराजेंच्या जीवनावरच हे लघुनाट्यरूप आकर्षक वाटावे. नाटकाच्या व्यावसायिक प्रवासास शुभेच्छा.
महामृत्युंजय : महानाट्याचे लघुरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2015 12:10 AM