नूल :
नूल (ता. गडहिंग्लज) येथील श्री सुरगीश्वर संस्थान मठाचे मठाधिपती षट्स्थळब्रम्ही उपाचार्यरत्न श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी (९०) यांचे वृद्धापकाळाने (शुक्रवारी, २७) पहाटे महानिर्वाण झाले. त्यामुळे सीमाभागात हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. मठातच त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच महाराष्ट्र व कर्नाटकातील हजारो भक्तांनी नूलमध्ये येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
दुपारी ३ वाजता सजविलेल्या पालखीतून गावातील प्रमुख मार्गावरून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता मठाच्या आवारातच त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी कर्नाटकातील निडसोशी मठाचे मठाधिपती श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी, अडनलहट्टी गुरुसिद्धेश्वर मठाचे शिवपंचाक्षरी महास्वामीजी, सुरगीश्वर मठाचे नवे मठाधिपती श्री गुरुसिद्धेवर स्वामीजी, आमदार राजेश पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, कागलच्या शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित घाटगे, सरपंच प्रियांका यादव, उपसरपंच प्रवीण शिंदे, संकेश्वर कारखान्याचे संचालक सोमगोंडा आरबोळे व उदयकुमार देसाई, जिल्हा बँकेचे संचालक संतोष पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वपूर्ण योगदान आणि सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनात अग्रेसर राहिलेल्या नूल गावात काही प्राचीन मठदेखील आहेत. त्यापैकी १ हजार वर्षांची परंपरा लाभलेल्या सुरगीश्वर संस्थान मठाचे ते अकरावे मठाधिपती होते. बंगळूरच्या संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी सुवर्णपदकासह पदवीचे शिक्षण घेतले होते. १९५४ मध्ये तत्कालीन मठाधिपती गुरुसिद्धय्या यांनी त्यांची मठाचे उत्तराधिकारी म्हणून नेमणूक केली होती. दरम्यान ११ वर्षे बंगळूरमध्ये राहून त्यांनी संस्कृत विषयातून सुवर्णपदकासह साहित्यालंकार ही पदवी संपादित केली होती. १९ डिसेंबर १९७७ रोजी श्री क्षेत्र रंभापुरी व काशी पीठाचे जगद्गुरू यांच्या उपस्थितीत त्यांचा पट्टाभिषेक झाला होता. त्यानंतर मार्च-एप्रिल २००९ मध्ये जीर्णोद्धारित मठाची वास्तुशांती, स्वामीजींचा अमृतमहोत्सव व धर्मसभा असा संयुक्त कार्यक्रम झाला होता.
जानेवारी २०२० मध्ये स्वामीजींचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा व त्यांचे उत्तराधिकारी श्री गुरुसिद्धेश्वर महास्वामीजींचा पट्टाभिषेक सोहळा पार पडला होता. बेळगाव जिल्ह्यातील मस्ती व हंचिनाळ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथे मठाची शाखा व जमिनी आहेत. नूलच्या मठात ज्ञानोपदेश, धर्माेपदेश, अन्नदान, अनुष्ठान, दीक्षा व धार्मिक शिक्षण आदी बाबी त्यांनी अखंडपणे सुरू ठेवल्या.
----------------------
चौकट- नूलच्या विकासात महत्त्वाचे योगदान
पाणी टंचाईमुळे नूल मठाच्या आवारातील दोन कूपनलिका त्यांनी गावासाठी खुल्या केल्या आहेत. गावातील श्री लक्ष्मी पतसंस्थेची स्थापना, न्यू इंग्लिश स्कूल इमारतीचे बांधकाम, ग्रामदैवत हनुमान मंदिर, गणपती मंदिर, महादेव मंदिर, लक्ष्मी मंदिर, रामपूरवाडीतील सिद्धेश्वर मठ व सुरगीश्वर मठाच्या जीर्णोद्धारात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून जंगम समाजातील मुलांसाठी शालेय आणि वैद्यकीय शिक्षणाची सोय त्यांनी मठात केली आहे.
----------------------
श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी : २७०८२०१९-गड-०९
- नूल (ता. गडहिंग्लज) येथे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांची काढण्यात आलेली शोभायात्रा.
क्रमांक ३ २७०८२०१९-गड-१०