कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाची सांगता बुधवारी महाप्रसादाने झाली. यावेळी सुमारे २५ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यानिमित्त श्री अंबाबाईची अन्नपूर्णा देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली होती.नवरात्रौत्सवानंतर येणाऱ्या अश्विन पौर्णिमेला अंबाबाई मंदिरात महाप्रसादाचे आयोजन केले जाते. बुधवारी सकाळी ११ वाजता महापौर शोभा बोंद्रे यांच्या उपस्थितीत महाप्रसादाला सुरुवात झाली.
यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, शहाजीराव जगदाळे, भरत ओसवाल, शिवाजीराव मोहिते, सचिन झंवर, अभिजित चव्हाण, पोलीस निरीक्षक मानसिंग खोचे, महालक्ष्मी भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी भाविकांना खीर, मसाले भात, भाजी, आमटीचा महाप्रसाद देण्यात आला. दुपारी चार वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा २५ हजार भाविकांनी लाभ घेतला.
कर्मचाऱ्यांचा सत्कारदरम्यान देवस्थान समितीच्या वतीने शारदीय नवरात्रौत्सवात राबविलेल्या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी भाविकांसाठी यात्री निवास व शहरात फिरण्यासाठी दोन बॅटरी कार उपलब्ध करून देण्याचा विचार असल्याचे सांगितले.