कोल्हापूर : दोन वर्षांपूर्वी आलेल्या महापुरापेक्षा यावेळी अडीच फुटाने पाणी जास्त होते. सहा दिवस दुकानातलं सामान पाण्यात भिजून होतं. पाणी एवढ्या वेगाने आलं की सामान हलवायला पण वेळ मिळाला नाही. पाणी ओसरल्यावर उघड्या डोळ्यांनी चिखलात बुडालेला व्यवसाय बघायची वेळ आलीय, काय काय शिल्लक नाही राहिलं महापूर, कोरोना, महापूर असंच होत राहिलं तर आम्ही जगायचं कसं अन् कोणकोणत्या संकटांचा सामना करत राहायचं.. ही अगतिकता आहे पुराच्या पाण्यात ज्यांचा व्यवसाय बुडाला त्या छोट्या व्यावसायिकांची. आता शासनाकडून काही मदत मिळते का याकडेच त्यांच्या नजरा लागल्या आहेत.
जिल्ह्यात २१ ते २४ तारखेदरम्यान झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये, नदी, ओढे, नाल्यांशेजारील घरांमध्ये व दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले. शहरातील शाहुपुरी, शाहुपुरी कुंभार गल्ली, लक्ष्मीपुरी, नागाळा पार्क येथे दोन वर्षांपूर्वीच्या महापुरावेळीदेखील पाणी आले होते, पण त्यावेळी पाण्याची पातळी कमी होती. यावेळी त्यापेक्षा अडीच फुटांनी पाणी जास्त होते त्यामुळे जेथे पाणी येणार नाही असे समजून व्यावसायिकांनी सामान हलवले त्या उंचीच्यावरपर्यंत पुराचे पाणी गेले. आभाळच फाटलं तिथं ठिगळ कुठं कुठं म्हणून लावणार अशी गत झाली आहे. कोरोना आधीच व्यवसाय बंद त्यात महापुराचा फटका एकामागोमाग येणाऱ्या या संकटांचा सामना करण्याइतपत पैश्यांची तजवीज कुठून करणार अशी विवंचना छोट्या व्यावसायिकांची आहे.
गणेशमूर्ती गेल्या वाहून...
गणेशोत्सवासाठी आम्ही शाडूच्यामूर्ती १०० बनवून ठेवल्या होत्या, गेल्यावेळी जेवढं पाणी आलं त्याचा अंदाज घेऊन मूर्ती लाफ्टवर ठेवल्या, येऊन बघतोय तर सगळ्या मूर्ती पुरात वाहून गेलेल्या, काही मूर्ती भंगलेल्या. प्लॅस्टरच्या मूर्तीदेखील पुन्हा वापरता येणार नाहीत. काय करणार महापालिकेची गाडी आल्यावर ट्रॉली भरून मूर्ती घेऊन गेली. एवढे दिवस स्वत:च्या कष्टाने घडवलेल्या मूर्तींचे झालेले नुकसान बघवत नाही. दोन वर्षांपूर्वी पण असंच नुकसान झालं. कुणाला सांगायचं, सहन करण्याशिवाय पर्याय नाही.
माधुरी पुरेकर (गणेशमूर्ती व्यावसायिक)
--
माझा कोचिंग वर्कसचा व्यवसाय आहे. पुरामळे स्पंज, रेक्झीनचं कापड, लाकडी फ्रेम, झालर असं दुकानातलं सगळं साहित्य भिजून गेलं. दुकान बुडेपर्यंत पाणी आलं. काय काय सामान बाहेर काढणार आणि कसं काढणार, धुवून पुन्हा वापरता येईल तेवढंच साहित्य आता राहिलंय. लॉकडाऊनमुळे तीन महिने सगळं बंद होतं आणि आता पुरामुळे कर्ज काढून नवीन माल भरायला पाहिजे.
धर्मेंद्र माने (व्यावसायिक,कोचिंग वर्क्स)
--
माझा रेडियमचा व्यवसाय आहे. पुराचे पाणी एवढ्या वेगाने वाढले की सामान हलवायला पण वेळ मिळाला नाही. संगणक, हंटिंग मशीन, फर्निचर, स्टॅन्डी बोर्ड, अक्रॅलिक, फ्रेम, पेस्टिंग ट्यूब, कटर ब्लेड, रंग सगळं पाण्यात बुडालं. उरलेल्या वस्तूंवर दोन दोन इंच माती साचलीय, ते धुवायला पाणी नाही, लाईट नाही. बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यातच स्वच्छता सुरू आहे. दुकानच आता नव्याने थाटावं लागणार आहे. त्यासाठी एवढा पैसा कुठून आणायचा.
गणेश कचरे (रेडियम व्यावसायिक)
---
मडकी, डेरे, पणत्या, कुंड्या, मातीचे बैलं या वरच आमचा व्यवसाय चालतोय. मातीचं काम आज पुरामुळं मातीतच गेलंंय. अर्ध्याच्यावर मातीच्या वस्तू फुटून गेल्या,एकदा मातीची तयार वस्तू भाजली की त्याचा परत वापर करता येत नाही. कोराेनामुळे व्यवसाय बंद होता तेव्हा दागिने विकून घर चालवलं आता काय विकणार, चार दिवस झाले सगळं सुरू होऊन तोपर्यंत पूर आला. व्याजाने पैसे आणून व्यवसाय उभारायला पाहिजे आता.
प्रकाश कुंभार (कुंभार व्यावसायिक)
--
माझं दुकान सहा दिवस पाण्यात होतं. पाईप, फिटिंगचे मटेरियल, वर्षानुवर्षांच्या व्यवहाराचे रेकॉर्ड असलेल्या फायली सगळं पाण्यात गेलं. सगळं सामान तीन दिवस झाले धुवून काढले, पण चिखल काही संपेना. त्यामुळे सगळे वस्तू गंजायलेत, असा माल गिऱ्हाईक घेत नाही. शेवटी हा माल भंगारात काढावा लागतो. दोन वर्षांपूर्वी पण असंच नुकसान झालं होतं.
पांडुरंग गायकवाड (हार्डवेअर दुकानदार)
--
फोटो स्वतंत्र
----