कोल्हापूर : आधीच आर्थिक परिस्थिती बिकट, त्यात सातव्या वेतन आयोगाचा पडलेला अतिरिक्त भार, कोरोनाच्या संसर्गामुळे झालेले नुकसान यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच कोल्हापूर महानगरपालिकेला नुकत्याच झालेल्या महापुरामुळे तब्बल ४० कोटींचा फटका बसला. दरम्यान, शहरातील नुकसानीचे अद्याप पंचनामे झाले नसल्यामुळे सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक यांचे किती नुकसान झाले, यांचा अंदाज अजून आलेला नाही.
अतिवृष्टी व महापुरामुळे कोल्हापूर शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. महापुराचे पाणी जलदगतीने वाढत गेल्यामुळे नागरिकांना आपले नुकसान टाळण्यास सुद्धा वेळ मिळाला नाही. अनेक कुटुंबे अंगावरील कपड्यानिशी घरातून बाहेर पडली होती. जे शक्य होते, ते वाचविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तरीही अपरिमित हानी झाली आहे. नुकसानीचे पंचनामे अद्याप झाले नसल्यामुळे शहरवासीयांचे वैयक्तिक किती नुकसान झाले, याचा अंदाज अजून आलेला नाही.
कोल्हापूर महानगरपालिकेस मात्र महापुराचा जबरदस्त फटका बसला आहे. अतिवृष्टी तसेच महापुरामुळे शहरातील सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात रस्ते, ड्रेनेज, गटर्स, रिटेनिंग वॉल, चेंबर यांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार शहरातील ११० किलोमीटरचे रस्ते महापुराच्या पाण्याने अत्यंत खराब झाले आहेत. आता हेच रस्ते दुरुस्त करायचे झाल्यास २७ कोटी ८६ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. म्हणजेच तेवढ्या रकमेचे रस्ते वाहून गेले. खराब रिटेनिंग वॉल, चेंबर, गटर, विद्युत उपकरणे यांचे ३ कोटी ५३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
महापुरात अडकल्यामुळे महानगरपालिकेच्या मालमत्तांचे अंदाजे चार कोटींचे नुकसान झाले आहे. संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा खंडित झाला असल्यामुळे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याकरिता ७० टँकर भाड्याने घेतले असून त्याचा ९० लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च पालिकेच्या तिजोरीवर पडणार आहे. बालिंगा, नागदेववाडी व शिंगणापूर येथील उपसा केंद्रे पाण्याखाली गेल्याने तेथील मोटारी, विद्युत ट्रान्स्फॉर्मर, विद्युत पॅनल बोर्ड यांच्या दुरुस्तीसाठी ४० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. रोगराई पसरू नये म्हणून तातडीने औषध खरेदीकरिता तसेच विविध उपाययोजना करण्याकरिता ४७ लाख रुपये खर्च करावे लागत आहेत. ड्रेनेज पंपिंग, मशिनरी दुरुस्ती व एसटीपी पूर्ववत करण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधी लागणार आहे.
-महापुरात ३९१४ मिळकींचे नुकसान -
महापुरात शहरातील ३९१४ मिळकतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पंचनामे न झाल्यामुळे त्यांच्या नुकसानीचा अंदाज आलेला नाही. मात्र, २०१९ साली आलेल्या महापुरात ज्यांचे नुकसान झाले होते, अशा पूरग्रस्तांना जाहीर केलेल्या मदतीनुसार ४३ कोटी ६० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले होते.