कोल्हापूर : सोमवारी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानासाठी जाहीर प्रचाराची सांगता उद्या, शनिवारी होत आहे. अवघा एकच दिवस हातात उरला असल्याने प्रचाराचा धुरळा उडाला असून, गावोगावी, गल्लोगल्लींत लगीनघाईचा माहोल आहे. पदयात्रा, रॅली, कोपरा सभांच्या माध्यमांतून उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निकराचा प्रयत्न करत आहेत.
गटांच्या फोडाफोडींसह एकगठ्ठा मतासाठी रसद पोहोचविणारी छुपी यंत्रणा सक्रिय झाली आहे. शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल करून प्रचाराचा नारळ फोडलेल्या उमेदवारांनी उद्या होत असलेली प्रचाराची सांगताही तितक्याच जंगी शक्तिप्रदर्शनाने करण्याची तयारी केली आहे.सोमवारी (दि. २१) होणाऱ्या मतदानासाठी आदर्श आचारसंहितेनुसार १९ ला प्रचाराची सांगता होत आहे. हातात एकच दिवस उरल्याने गुरुवारी उमदेवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधली आहे. बुधवारी दुपारनंतर आलेल्या पावसाने प्रचाराच्या नियोजनावर पाणी फिरविल्याने गुरुवारी मात्र सकाळच्या टप्प्यातच प्रचारावर भर देण्यात आला.
घराघरांतील प्रचार बैठकांसह कोपरा सभांच्या माध्यमातून झडलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीने राजकीय वातावरण ढवळून निघाले. दुपारी ढग भरून आले होते; पण पाऊस पडला नाही; त्यामुळे उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडत प्रचाराचा बार जोरात उडवून दिला. गल्लोगल्ली फिरणाऱ्या प्रचाराच्या गाड्या आणि मतदारांच्या थेट भेटीगाठीतच गुरुवारचा दिवस संपला.जिल्ह्यात चुरशीच्या तिरंगी, चौरंगी लढती होत असल्याने विजयाचे समीकरण जुळविण्यासाठी एकगठ्ठा मतांची जोडणी लावणे महत्त्वाचे असल्याची जाणीव सर्वच उमेदवारांना आहे; त्यामुळेच एका बाजूला प्रचाराचे रण पेटवतानाच दुसऱ्या बाजूला एकगठ्ठा मतांचीही जुळवाजुळव केली जात आहे; त्यासाठी साम, दाम, दंड, भेद या चाणक्य निती अस्त्राचाही आधार घेतला जात आहे.
गावातील मोठ्या कुटुंबातील प्रमुखांसह, गट सांभाळणाऱ्या आणि तरुण मंडळाच्या अध्यक्षांकडून याद्या मागवून त्यांच्यामार्फत रसद पुरविण्याची व्यवस्थाही केली जात आहे. शहरात तरुण मंडळे, तालमी, अपार्टमेंट, कॉलनी, सोसायट्यांमधील म्होरक्यांना गाठून प्रचार साहित्य देण्याच्या निमित्ताने रसद पुरविण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील झोपडपट्टी भागांत एकगठ्ठा मतदान आपल्याकडे वळविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराने खास यंत्रणा तैनात केली आहे.मते फिरविण्याची ताकद असलेल्या गटांना चांगले दिवस आले असून, त्यांना भविष्यातील पदांसह अनेक आमिषे दाखवून त्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले जात आहे; यासाठी छुप्या यंत्रणेसह सोशल माध्यमाचाही आधार घेतला आहे. एकमेकांच्या उखाळ्या, पाखाळ्या काढण्यासाठी प्रचारात प्रभावी अस्त्र वापरले गेलेल्या या माध्यमाचा आता एकमेकांची बदनामी करण्यासाठी, जुन्या क्लिप्स टाकून मतदारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचाही प्रयत्न होताना दिसत आहे.
प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जाहीर सभेपेक्षा वैयक्तिक गाठीभेटीवरच भर देण्याचे उमेदवारांचे नियोजन दिसत आहे. पावसाचाही अडथळा असल्याने सभेत यंत्रणा गुंतविण्याऐवजी गावागावांत, गल्लोगली पदयात्रांवरच भर आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची आज चंदगड आणि करवीरमधील सभा वगळता कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या आज कोल्हापुरात जाहीर सभेचे नियोजन नाही. उद्या, शनिवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व अमोल मिटेकरी यांच्या कसबा वाळवा, कागल, नेसरी येथे सभा होणार आहेत.