कोल्हापूर : विधानसभेचा प्रचार संपण्यास अवघे तीन दिवस राहिल्याने जिल्ह्यात प्रचार टिपेला पोहोचला आहे. विकासकामांबरोबरच आरोप प्रत्यारोपांनी मतदारसंघ दणाणले असून, येत्या दोन दिवसांत राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा मोठ्या प्रमाणात होणार आहेत.जिल्ह्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीविरोधात शिवसेना-भाजप असा सामना होत आहे. आघाडी व युतीत सरळ लढत होत असली, तरी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडाळी माजली आहे. ‘जनसुराज्य’च्या आडून तीन-चार मतदारसंघात भाजपचे बंडखोर मैदानात उतरले आहेत. भाजपचे अधिकृत दोनच उमेदवार रिंगणात असल्याने पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांची सभा वगळता राज्य पातळीवरील फारसे नेते इकडे फिरलेले नाहीत.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी चार सभा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. बंडखोरांमुळे युतीत वादंग होऊ नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे बंडोबांना सातत्याने दम देत आहेत.वास्तविक प्रचार हा विकास कामांभोवतीच फिरला पाहिजे; पण विकासाचे मुद्दे बाजूला पडत असून, व्यक्तिगत उणे-दुणे काढले जात आहेत. प्रत्येक मतदारसंघात प्रचाराचे मुद्दे वेगळे असून, एकमेकांचे कच्चे दुवे शोधून त्यावर प्रहार करण्याची संधी उमेदवार सोडत नाहीत. जाहीर प्रचारासाठी अवघे तीनच दिवस राहिल्याने प्रचार टिपेला पोहोचला आहे.
जाहीर सभा आणि गाठीभेटींची नुसती रेलचेल सुरू झाली आहे. ग्रामीण भागात सध्या सुगीची धांदल असल्याने सकाळी दहापर्यंत आणि सायंकाळी पाचनंतर प्रचार गती घेत आहे. उमेदवारासह पाच-सहा ताफे मतदारसंघात फिरत असल्याने वातावरण निर्मिती जोरात होत आहे.शनिवारी (दि. १९) जाहीर प्रचार संपणार असून, रविवारी (दि. २०) छुपा प्रचार व गुप्त बैठकांना ऊत येणार आहे. सोमवारी (दि. २१) मतदान होत असून, गुरुवारी (दि. २४) ला मतमोजणी होत आहे.शरद पवार शुक्रवारी कोल्हापुरातराष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी (दि. १८) कोल्हापुरात येत आहेत. चंदगड मतदारसंघातील उमेदवार राजेश पाटील यांच्यासाठी ते सभा घेणार, असे आता जरी नियोजन असले, तरी जिल्ह्यात आणखी एक सभा घेण्याची शक्यता आहे. करवीरमधील कॉँग्रेसचे उमेदवार पी. एन. पाटील यांच्यासाठी कोपार्डे येथे सभा घेण्याची शक्यता आहे.बदनामे अस्त्र बाहेर!मतदानासाठी काही दिवस राहिल्याने प्रत्येक निवडणुकीतील जालीम अस्त्र बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. एकमेकांची बदनामी करणारे संदेश फिरू लागले असून, त्यातून मतदारांमध्ये संभ्रमावस्था पसरली जात आहे. त्याचबरोबर अफवांचे पेवही आता फुटणार आहे. हा फुटला, त्याने ‘पाव’ खाल्ला अशा बातम्या जाणीवपूर्वक पेरण्यास सुरुवात झाली आहे.