Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर : मतदानाच्या आधीचा रविवार आज असल्याने जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांमध्ये प्रचाराचा जोर वाढणार आहे. त्यादृष्टीने उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी नियोजन सुरू केले आहे. बुधवारी २० नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी पाच या कालावधीत मतदान होणार आहे.
यानिमित्ताने पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करण्यासाठी उमेदवार सज्ज झाले असून, हा प्रचाराचा धमाका आज पाहावयास मिळणार आहे. गेले पंधरा दिवस प्रचार सुरु असून रविवार सुटीचा दिवस असल्याने तो सत्कारणी लावण्यासाठी उमेदवारांनी जय्यत तयारी केली आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे.
त्यामुळे रविवारच्या सुटीच्या दिवशी एक तर बहुतांशी मतदार घरात भेटणार असल्याने पदयात्रांना जोर राहणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांनी सकाळच्या सत्रातही पदयात्रा ठेवल्या आहेत. रात्री दहापर्यंतही या पदयात्रा चालणार आहेत. रविवारच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठीही तयारी सुरू असून, या जंगी प्रचारामुळे वातावरण ढवळून जाणार आहे.
जोरदार सभामहायुतीचे कोल्हापूर उत्तरचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी सदर बाजार येथे रविवारी संध्याकाळी सभा ठेवली असून, त्यांची शेवटची सभा कसबा बावड्यात रात्री आठ वाजता भाजी मंडईत होणार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांनीही पदयात्रा आणि सभांचा धडाका लावण्याचे नियोजन केले आहे.
उद्यासाठी विशेष नियोजनउद्या, सोमवारी जाहीर प्रचाराची सांगता असल्याने संध्याकाळी सहाच्या आधी अधिकाधिक लोकांशी संपर्क साधण्याचे नियोजन उमेदवारांकडून सुरू आहे. अजूनही भागात प्रभाव टाकणारा नेता, कार्यकर्ता, मान्यवर व्यक्ती पाठिंबा देऊ शकते का याचीही चाचपणी सुरू असून, शेवटच्या टप्प्यात तसे धक्के देण्यासाठीही दहाही मतदारसंघांत नेत्यांनी नियोजन लावले आहे.