चंदगडमध्ये गोपाळरावांची माघार, पुढील निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2024 03:49 PM2024-11-04T15:49:41+5:302024-11-04T15:55:26+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : गोपाळराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघात महाआघाडीमध्ये विसंवाद असल्याचे चित्र अद्याप पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार डॉ. नंदा बाभूळकर यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, आता गोपाळराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
गोपाळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, "सतेज पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही काम करत आहोत. काँग्रेसला उमेदवारी मिळेल, या अपेक्षेने आम्ही अर्ज भरला होता. परंतू काँग्रेसला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे पक्षश्रेष्टींच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच, ज्यावेळी मी उमेदवारी अर्ज भरला, तो कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर भरला होता. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना विचारून मी पुढील निर्णय घेईन".
दरम्यान, दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांची कन्या डॉ. नंदिनी बाभूळकर यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेस नेते विनायक पाटील आणि गोपाळराव पाटील यांनी अर्ज भरले होते. मात्र, आज गोपाळराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर विनायक पाटील अद्याप निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता गोपाळराव पाटील हे विनायक पाटील यांना पाठिंबा देणार की,डॉ. नंदिनी बाभूळकर यांना हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे, महायुतीतर्फे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे राजेश पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवत भाजप नेते, फडणवीस समर्थक शिवाजी पाटील यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. अशातच मानसिंग खोराटेही रिंगणात असून त्यांना महायुतीत घटक असलेल्या जनसुराज्य शक्तीचा पाठिंबा मिळाला आहे.त्यामुळे जनसुराज्य शक्ती पक्षाची राजकीय खेळी महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.