Maharashtra Assembly Election 2024 : तुरंबे : हलगले, कोंडूशी, बोरवडे येथील शेकडो एकर जमीन तर मुदाळ येथील शिक्षण संस्था, बंगळुरूला आलिशान हॉटेल असणारे माजी आमदार के. पी. पाटील यांचा प्रवास एक ट्रक ड्रायव्हर ते तीन हजार कोटींचा मालक असा कसा झाला, अशी विचारणा आमदार प्रकाश आबिटकर यांनी ठिकपुर्ली येथील सभेत केली. आबिटकर म्हणाले, के. पी. पाटील यांची कातडी गेंड्याची आहे. निगरगट्ट माणसाला समाजाचे कोणतेही देणे- घेणे नाही. निवडणूक आली की लोकांकडे जाऊन बुद्धिभेद करायचा आणि आपली पोळी भाजून घ्यायचा त्यांचा नेहमीचाच उद्योग आहे.
निष्क्रिय उमेदवार असलेल्या के. पी. पाटील यांनी आमदार असताना काय दिवे लावले हे स्वाभिमानी जनतेला चांगलेच ठाऊक आहे. मतदारसंघाचे कागल करतो अशी तोंडाची बाष्कळ वाफ घालवत त्यांचा कार्यकाळ लबाडी करण्यातच गेला. अरुणराव जाधव म्हणाले, ठिकपुर्ती गावातील एका मावशीने आमदार आबिटकर यांनी चांगले काम केले असल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली; पण नेते मंडळी दबावतंत्र वापरत आहेत. के. पी. पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.
अभिषेक डोंगळे म्हणाले, आबिटकर यांनी ठिकपुर्ली गावास नऊ कोटींहून अधिक निधी दिला असून के. पी. यांनी या गावास किती निधी दिला हे जाहीर करावे. यावेळी सरपंच प्रल्हाद पाटील, उपसरपंच शिवाजी साठे, माजी सरपंच राजेंद्र चौगले, चंद्रकांत संकपाळ, आनंदा पाटील, भिवाजी पाटील, हिंदूराव म्हाळुंगेकर, विजय चौगले, लहूजी जरग, सुरेश भोई, अमित चौगले, संग्रामसिंह चौगले, शहाजी कांबळे, साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते. सुनील चौगले यांनी प्रास्ताविक केले.
धनशक्तीला जनता भीक घालणार नाही.. के. पी. पाटील यांना जनतेतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी आता धनशक्तीचा वापर सुरू केला आहे मात्र राधानगरीची सुज्ञ जनता या आमिषाला बळी न पडता आबिटकर यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास अरुण जाधव यांनी व्यक्त केला.