Kagal Assembly Constituency : कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रवादीच्या सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. गडहिंग्लज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार समरजितसिंह घाडगे यांच्या प्रचारसभेत शरद पावर बोलत होते. यावेळी शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले, यांना पाडलं पाहिजे, अशा शब्दात शरद पवारांनी टीका केली.
"काही लोक दुर्दैवाने वेगळ्या रस्त्याने गेले. दुर्दैवाने त्यामध्ये तुमच्याही जिल्ह्याचा नंबर आहे. एकेकाळी समाजकारण करण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. कागलबाबत विचार करत असताना मनात आलं की हा एक ऐतिहासिक भाग आहे. त्यामुळे कोण कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आहे याचा विचार आम्ही केला नाही. विचार करत असताना अनेकांची नावे पुढे आली त्यामध्ये हसन मुश्रीफांचे सुद्धा नाव होते. त्यामुळे त्यांना संधी देण्यात आली आणि ते विधानसभेत गेले. आमचे संख्याबळ वाढल्यानंतर त्यांना मंत्रिपदाचीही संधी देण्यात आली. पण दुर्दैवाने आज काय पाहायला दिसतंय ज्यावेळी महाराष्ट्राला गरज आहे त्यावेळी साथ द्यायची सोडून आमचे काही लोक निघून गेले," असं शरद पवार यांनी म्हटलं.
"एक दिवस मला भेटायला आले आणि सांगितले की आम्ही काहीतरी वेगळा विचार करत आहोत तुम्ही आमच्याबरोबर चला. मी त्यांना म्हटलं तुम्ही मतं कोणाला मागितली, कोणाच्या विरुद्ध मागितली आणि भाजप सोबत जायचं म्हणता. हे माझ्याच्याने काही शक्य नव्हतं. तुम्हाला काय करायचे ते करा. हे योग्य नाही आणि या गोष्टीला आम्ही कदापि पाठींबा देणार नाही. त्यांनी हळूच कानात सांगितलं की तुम्ही आमच्या बाबतीत विचार नाही केला तर आम्हाला आत जावं लागेल. त्यानंतर त्यांच्या घरावर ईडीची धाड पडली. हे सगळं घडू नये म्हणून या लोकांनी हा उद्योग केला आणि याच्यामध्ये सत्यता किती आहे हे परवा छगन भुजबळांनी सांगितलं, असेही शरद पवार म्हणाले.
"मला स्वतःला एक दिवशी राज्य सहकारी बँकेच्या संदर्भात ईडीची नोटीस आली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही हजर राहा. मी चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की बँकेत काहीतरी गैरव्यवहार झाला आहे. त्या बँकेचा मी सभासद नाही, बँकेतून एक पैसा कर्ज काढले नाही, बँकेचा मी थकबाकीदार नाही मग मला कसली भीती. मी सांगितलं तुम्ही बोलावलं तर मी उद्या येतो आणि त्यानंतर मुंबईला गेलो. त्यावेळी तुमच्यासारखे हजारो कार्यकर्ते जमले आणि निघतो म्हटल्यानंतर धावत पळत पोलीस आयुक्त आमच्या ऑफिसमध्ये आले. ते म्हटले की येऊ नका आम्ही तुम्हाला हात जोडतो येऊ नका. ते म्हणाले हे काम चुकून झालं. मी म्हटलं त्यात माझं नाव आहे ना. ते म्हणाले तुमचं नाव आहे पण तुम्ही येऊ नका आणि शेवटी त्यांनी मला हात जोडून कळवलं की तुमच्याबद्दलची तक्रार सत्यावर आधारित नाही म्हणून तुम्ही येण्याची आवश्यकता नाही. पुन्हा मला कधी त्यांनी बोलावलं नाही," असं शरद पवारांनी सांगितलं.
"ईडीच्या भीतीने जे लोक आम्हाला सोडून गेले त्यांच्या फायली भाजपने बाजूला ठेवल्या आहेत. लोकं निर्लज्जासारखं आम्हाला सोडून गेले. काही लोक मोठ्या तोंडाने सांगत आहेत मी पवारांना सांगून गेलो. आपण झक मारायची आणि दुसऱ्याचं नाव घ्यायचं असा हा प्रकार आहे. हसन मुश्रीफ यांना पाडलंच पाहिजे. पाडलंच पाहिजे, पाडलंच पाहिजे," असं आवाहन शरद पवार यांनी केलं.