राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2024 12:57 PM2024-11-05T12:57:44+5:302024-11-05T12:58:47+5:30
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष उमेदवार राजेश लाटकर हे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी अनपेक्षितपणे निवडणूक लढण्यापूर्वीच रिंगणातून माघार घेऊन सर्वांना धक्का दिला. मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतल्यानंतर काँग्रेस आता अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच, राजेश लाटकर हे उद्धव ठाकरे यांचीही भेट घेणार आहेत.
उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राजेश लाटकर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दुपारी दोन वाजता होणार भेट आहे. राजेश लाटकर कोल्हापूर उत्तर मध्ये शिवसेना ठाकरे गटाचा पाठिंबा मिळावा, यासाठी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे.
मी काँग्रेसच्या विचारांचा कार्यकर्ता आहे. सतेज पाटील माझे नेते होते, आहेत आणि राहणार आहेत, अशा शब्दांत राजेश लाटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच, शाहू महाराज यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचा आभारी आहे. सतेज पाटील हे माझे काल देखील नेते होते आज देखील नेते आहेत आणि उद्या देखील नेते राहतील. मला काँग्रेसच्या वतीने पाठिंबा देण्यासाठी त्यांना भेटणार आहे, असे राजेश लाटकर यांनी सांगितले.
दरम्यान, काँग्रेसने आपली उमेदवारी पुरस्कृत करावी, अशी मागणी राजेश लाटकर यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. याबाबत सतेज पाटील यांनी आपण आज, मंगळवारी निर्णय घेऊ अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात काँगेस राजेश लाटकर देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
लाटकरांचे तिकीट कापून मधुरिमाराजेंना संधी
कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातून काँग्रेसने आधी राजेश लाटकर यांना तिकीट दिले होते. मात्र काही नगरसेवकांनी राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला.तसेच, यासंबंधीचे पत्र या नगरसेवकांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना दिले होते. त्यानंतर सतेज पाटील यांनी पक्षश्रेष्टींसोबत चर्चा करून राजेश लाटकर यांची उमेदवारी रद्द करून मधुरिमाराजे छत्रपती यांना तिकीट दिले. मात्र, मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता सतेत पाटील यांच्यावर नामुष्की ओढवली आहे.