Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आज रविवारी सकाळी १०:३० वाजता तपोवन मैदानावर सभा होणार आहे. या सभेसाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू असून, योगी यांची ही कोल्हापूरमधील पहिलीच सभा आहे. योगी यांची याआधी लोकसभा निवडणुकीवेळी इचलकरंजीला सभा झाली होती.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महिन्याभरापूर्वीच पाच जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांशी कोल्हापूरमध्ये संवाद साधला होता. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुरलीधर मोहोळ यांच्या सभा झाल्या.
आता महायुतीने जाणीवपूर्वक कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर या तीन मतदारसंघांचा प्रामुख्याने विचार करून योगी यांची ही सभा आयोजित केली आहे. या सभेच्या नियोजनासाठी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, रूपाराणी निकम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली.