Maharashtra Assembly Election 2024 : उजळाईवाडी : लाडकी बहिणीचे पैसे घेतले आणि काँग्रेसच्या प्रचाराला गेल्यास त्या महिलांचे फोटो काढून आम्हाला द्या, त्यांची व्यवस्था करतो अशी भाषा भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. व्यवस्था करतो ही महाडिक यांची कसली भाषा आहे असा संतप्त सवाल काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी विचारला.
काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ येथे शनिवारी (दि.९) झालेल्या दुर्गाशक्ती संवाद मेळाव्यात त्या बोलत होत्या. भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांच्या उजळाईवाडीतच शनिवारी झालेल्या सभेत खासदार महाडिक यांनी ज्या महिला आमच्या लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊन काँग्रेसच्या प्रचाराला किंवा रॅलीला गेल्यास त्यांचे फोटो काढून आम्हाला पाठवा, त्यांची काय व्यवस्था करायची ते आम्ही बघतो असे वादग्रस्त विधान केले. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. त्याची दखल खासदार प्रणिती शिंदे यांनीही घेतली. त्या म्हणाल्या, भाजपच्या काळात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली. चिमुरड्या मुलींवर अत्याचार होत आहे. अशा राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांना भाजप पाठीशी घालत आहे.
आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, गेली पाच वर्षे मतदारसंघातील महिला भगिनींसाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबविले. महिलांचे आशीर्वाद आणि पाठबळ माझ्या विजयात महत्त्वाचे ठरेल. सरपंच उत्तम आंबवडेकर म्हणाले, महिला संवाद मेळाव्याला झालेली गर्दी आमदार ऋतुराज पाटील यांच्या विजयाची नांदी आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, जिल्हा बैंक संचालक स्मिता गवळी, अश्विनी शिरगावे, शैलजा भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.
विजयाची साक्ष आजपर्यंतच्या कारकिर्दीत महिलांची एवढी गर्दी पहिल्यांदाच पाहिली. ही गर्दी आमदार पाटील यांच्या विजयाची साक्ष देत आहे. ऋतुराज यांच्यासारखा कार्यक्षम तरुण आमदार आपल्याला लाभला आहे. विधानसभेच्या लॉबीमध्येही कर्मचाऱ्याऱ्यांची विचारपूस करणारा हा एकमेव आमदार असल्याचे कौतुकोद्गार प्रणिती शिंदे यांनी काढले.
लाव रे तो व्हिडीओ...खासदार प्रणिती शिंदे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत खासदार धनंजय महाडिक यांचा व्हिडीओ स्क्रीनवर लावण्यास सांगितला. व्हिडीओ पूर्ण होताच त्यांनी धनंजय महाडिक यांचा तीव्र शब्दांत निषेध केला.