Kolhapur South Vidhan Sabha Election 2024: दक्षिणेत वारे फिरले, अमल जिंकले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 06:40 PM2024-11-24T18:40:36+5:302024-11-24T18:42:02+5:30

चुरशीच्या लढतीत बाजी : १८३३७ मताधिक्य, पहिल्या फेरीपासूनच विजयी आघाडी

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Amal Mahadik, the candidate of the BJP in the grand alliance, won in the Kolhapur South Assembly Constituency | Kolhapur South Vidhan Sabha Election 2024: दक्षिणेत वारे फिरले, अमल जिंकले

Kolhapur South Vidhan Sabha Election 2024: दक्षिणेत वारे फिरले, अमल जिंकले

भिमगोंडा देसाई-पोपट पवार 

कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेची लढत झालेल्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीतील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांचा १८ हजार ३३७ मतांनी शनिवारी पराभव केला.

वारं फिरलंय ही महाडिक यांची टॅगलाईन प्रभावी ठरल्याने दक्षिणेत ऋतुराज पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. चुरशीच्या लढतीत पाटील यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. मात्र पहिल्यापासून महाडिक यांची मतांची आघाडी कायम राहिल्याने पाटील यांचा पराभव झाला. विजयी उमेदवार महाडिक यांना १ लाख ४७ हजार ९९३ तर पाटील यांना १ लाख २९ हजार ६५६ मते मिळाली. येथील व्ही. टी. पाटील सभागृहात मतमोजणी झाली.

काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील व खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी या मतदारसंघात प्रतिष्ठा पणाला लावली होती. येथे चुरशीने ७५.६० टक्के मतदान झाले होते. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार असलेल्या या मतदारसंघात दोन्ही गटांकडून प्रचारात आरोप-प्रत्यारोपांची फैरी झडल्या होत्या. त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते.

पहिल्यांदा पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतांमध्ये पहिल्या फेरीपासून ऋतुराज पाटील आघाडीवर राहिले. त्यांना पोस्टल मध्ये सर्वाधिक १६०६ मते मिळाली. याउलट विरोधी महाडिक यांना ८९९ मते मिळाली. पोस्टलच्या मतमोजणीनंतर मतदान यंत्रावरील मतांच्या मोजणीला सुरुवात झाली. यामध्ये पहिल्या फेरीपासून महाडिक यांनी आघाडी घेतली. महाडिक यांची शेवटपर्यंत आघाडी कायम राहिली. अखेरच्या फेरीअखेर महाडिक यांनी तब्बल १८ हजार ३३७ मताधिक्याने विजयी झाले.

उमेदवारनिहाय पडलेली मते अशी :

  • अमल महाडिक (भाजप) :१४७९९३
  • ऋतुराज पाटील (काँग्रेस) : १२९६५६
  • सुरेश आठवले ( बहुजन समाज पार्टी) : ९५३
  • अरुण सोनवणे (स्वाभिमानी पक्ष) : १४६
  • विशाल सरगर (राष्ट्रीय समाज पक्ष) : ११८
  • विश्वास तरटे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए) : ११८
  • गिरीश पाटील (अपक्ष) : ८७
  • माधुरी कांबळे (अपक्ष) : २०३
  • ॲड. यश हेगडे-पाटील (अपक्ष) :१३७
  • वसंत पाटील (अपक्ष) : १६०
  • सागर कुंभार (अपक्ष) : ५२८
  • नोटा : १६४६


दक्षिणमध्ये २-२ बरोबरीत

‘दक्षिण’मध्ये २००९ च्या पुनर्रचनेनंतर चार निवडणुका झाल्या. यामध्ये काँग्रेसने दोन तर भाजपने दोनवेळा बाजी मारली. २००९ मध्ये काँग्रेसचे सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे अमल महाडिक यांनी सतेज पाटील यांचा अनपेक्षितरीत्या पराभव केला. पुढे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी अमल यांंच्यावर विजय मिळवला होता. आता २०२४ च्या निवडणुकीत अमल यांनी या पराभवाचे उट्टे काढले.

विजयाची कारणे

  • आमदार नसतानाही २०० कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा मतदारसंघात रुजवण्यात यशस्वी
  • मतदारसंघातील रस्ते, पाणी व मूलभूत प्रश्नांकडे बोट दाखवत विरोधकांवर केलेले टीकास्त्र रुजले
  • भाजपच्या पहिल्याच यादीत नाव आल्याने प्रचारासाठी पुरेसा वेळ
  • हिंदुत्ववादी मतांची एकजूट पाठीशी


पराभवाची कारणे

  • याेगींच्या सभेने तयार झालेली हिंदुत्ववादी लाट थोपविण्यात अपयश
  • विकासकामे केली नसल्याचा आरोप खाेडून काढण्यातच गेला वेळ
  • केलेली विकासकामे जनतेपर्यंत पाेहोचविण्यात अपयश
  • नेत्यांची एकजूट पण जनता पाठीशी राहिली नाही


नऊ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त

दक्षिणमध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील वगळता इतर नऊ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या १/६ म्हणजेच १६.३३ टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाली. यामुळे या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली.

दोन मतदान यंत्रात बिघाडमुळे..

मतमोजणी दरम्यान दोन मतदान यंत्रात बिघाड झाले. यामुळे या दोन मतदान यंत्रावरील व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्यांची मोजणी करण्यात आली. यामुळे निर्धारित २३ फेरी अधिक या चिठ्ठ्यांची एक अशी एकूण २४ फेऱ्यांमध्ये मतमोजणी झाली. एकूण ११८ कर्मचाऱ्यांनी मोजणी केली. मतदान यंत्रावरील मोजणी १६, पोस्टल मतांची १०, जवानांची मते चार टेबलवर मोजण्यात आली. सर्वात शेवटी एकूण मतदान यंत्रापैकी चिठ्ठी टाकून पाच यंत्रावरील व्हीव्हीपॅटवरील चिठ्ठ्या मोजण्यात आल्या. निवडणूक निर्णय अधिकारी हरिश धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 Amal Mahadik, the candidate of the BJP in the grand alliance, won in the Kolhapur South Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.