कोल्हापूर : भाजप नेते गृहमंत्री अमित शाह यांची कोल्हापूरऐवजी आता शुक्रवारी इचलकरंजीत सभा होणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची कोल्हापूरला सभा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही लवकरच जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून त्यांच्याही सभांचे नियोजन करण्यात येत आहे.पूर्वीच्या नियोजनानुसार अमित शाह हे शुक्रवारी सकाळी ११ वाजता कोल्हापूरमध्ये सभा घेणार होते आणि त्यांची सभा इचलकरंजीत व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानुसार शाह हे महिनाभरापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र पदाधिकारी मेळाव्याच्या निमित्ताने कोल्हापुरात येऊन गेल्याने त्यांची शुक्रवारी संध्याकाळी इचलकरंजीत सभा होण्याची शक्यता आहे. सकाळी शिराळा येथे सभा होईल. शाह यांची कोल्हापुरात सभा होणार नसल्याने आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेची मागणी करण्यात आली असून ती निश्चित होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर उत्तर आणि दक्षिणसाठी त्यांना आणण्यात येणार आहे.याचबरोबर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, स्मृती इराणी, माजी मंत्री पंकजा मुंडे, आमदार चित्रा वाघ यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे. महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होणार असून यामध्ये या नेत्यांच्या सभांचे नियोजन करण्यात येणार आहे.
अमित शाह इचलकरंजीत, योगी आदित्यनाथ कोल्हापुरात; महायुतीकडून धडाडणार तोफा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2024 1:21 PM