समीर देशपांडेकोल्हापूर : मूळ कोल्हापूरचे असलेले; परंतु अन्य जिल्ह्यातून निवडून येण्याची कामगिरी जिल्ह्यातील पाच जणांनी आतापर्यंत करून दाखवली आहे. यातील चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत हंडोरे यांनी तरी मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. त्यांच्यासह रमेश लटके, ऋतुजा लटके आणि अशोक जाधव यांनीही विधानसभा जिंकून ही किमया करून दाखवली आहे; मात्र यातील महत्त्वाचा फरक म्हणजे चंद्रकांत पाटील हे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असताना पुण्यात लढून जिंकले, तर उर्वरित सर्वजणांची राजकीय कारकीर्दच मुंबईत सुरू झाली.गेली ३० वर्षे प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात जाऊन विधानसभा जिंकण्याची कामगिरी वर्ष २०१९ मध्ये केली. यंदा ते दुसऱ्यांना पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून निवडणूक लढवत असून या लढतीकडे कोल्हापूरवासीयांचे आणि विशेषत: भाजप नेते, कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. पाटील २००८ आणि २०१४ अशा दोन वेळा १२ वर्षांसाठी विधानपरिषदेवर निवडून आले. २०१४ मध्ये त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आणि एकापेक्षा एक मातब्बर खाती त्यांच्याकडे देण्यात आली;परंतु २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना पुणे शहरातील कोथरूड मतदारसंघाची निवडणूक लढवण्यास सांगितली. त्यावेळी २५ हजारांच्या मताधिक्याने विरोधी प्रमुख उमेदवाराचा पराभव केला. आधीच कोथरूडच्या तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी यांची उमेदवारी कापल्याने निर्माण झालेल्या वादळात पाटील यांना हा विजयाचा दिवा लावला. आता ते याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत.
पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यातील चौघेजण यशस्वीकोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मूळचे मसूद मालेगावचे चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसकडून मुंबईतून आमदार होऊन सामाजिक न्यायमंत्रीही झाले होते. गेली अनेक वर्षे मुंबईत एकनिष्ठपणे त्यांनी काँग्रेसचे काम केले. त्यामुळे त्यांना काँग्रेसकडून राज्यसभेवर संधी देण्यात आली.पन्हाळा तालुक्यातील कोलोलीचे अशोक जाधव हे देखील मुंबईतून दोन वेळा काँग्रेसकडून आमदार झाले. आताही ते पुन्हा काँग्रेसकडून मुंबईतून निवडणूक रिंगणात आहेत.शाहूवाडी तालुक्यातील येळवण जुगाई येथील रमेश लटके हे देखील मुंबईतून शिवसेनेकडून आमदार झाले होते. त्यांनी शाहूवाडीतूनही निवडणूक लढवली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके या देखील आमदार झाल्या. रोजगारासाठी मुंबईत गेलेल्या या सर्वांनी आपला राजकीय झेंडा फडकवला. जिल्ह्यातील काही तालुक्यांतील अनेकांनी मुंबई आणि परिसरातील महापालिकांमध्ये नगरसेवक आणि अन्य महत्त्वाच्या पदांवर बाजी मारली आहे.