कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून राजेश लाटकर यांना दिलेल्या उमेदवारीवरुन काँग्रेस पक्षात असंतोष निर्माण झाला आहे. जाहीर झालेला हा उमेदवार लादलेला आहे. तो बदलण्यासाठी फेरविचार करावा या मागणीचे निवेदन पक्षाच्या २६ माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्याकडे रविवारी दिले आहे.माजी नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या लेटरहेडवर पक्षाच्या माजी नगरसेवकांनी तसेच माजी पदाधिकाऱ्यांनी ही मागणी केली आहे. या मतदारसंघातून काँग्रेसने शनिवारी राजेश लाटकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे.या उमेदवाराने काँग्रेसमध्ये तसेच दिलेल्या मतदारसंघात कोणतेही भरीव कार्य केलेले नाही, तसेच त्यांचा लोकसंपर्क नाही, असा आरोप या नेत्यांनी केला आहे. त्यांच्याकडे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही नाही, त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या उमेदवारीवरून प्रचंड नाराजी असल्याने त्यांना प्रतिसाद मिळणार नाही, असा आम्हाला विश्वास असल्याचे या नगरसेवकांनी या पत्रात म्हटले आहे. या पत्रावर शारंगधर देशमुख, निलोफर आजरेकर, दुर्वास कदम, संजय माेहिते, सचिन चव्हाण, अर्जुन माने, प्रतीक्षा धीरज पाटील, जय पटकारे, संदीप नेजदार, प्रतापसिंह जाधव, इंद्रजित बाेंद्रे, उमा शिवानंद बनछोड, वहिदा फिरोज सौदागर, मधुकर रामाणे, छाया उमेश पोवार, अभिजित चव्हाण, रीना कांबळे, संदीप सरनाईक, शेखर जाधव, दीपा मगदूम, मेहजबीन सुभेदार, अफजल पिरजादे, भूपाल शेटे, नियाज खान, राजाराम गायकवाड, पूजा नाईकनवरे, जयश्री चव्हाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.दगडफेक अन् तणावराजेश लाटकर यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेल्या इच्छुक उमेदवाराच्या समर्थकांनी मध्यरात्रीच्या सुमारास काँगेस कार्यालयावर दगडफेक केली. काल, रविवारी दोन्हा गट आमने-सामने आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार बदला; काँग्रेसमध्ये राजेश लाटकर यांच्या उमेदवारीवरुन असंतोष
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 12:37 PM